इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात एजबस्टन क्रिकेट ग्राउंड, बर्मिंघम येथे पाचवा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताने पहिले दोन दिवस गाजवले आहेत. यामध्ये रिषभ पंत (Rishabh Pant) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja)यांनी तुफानी खेळी करत संघाची धावसंख्या तीनशेच्या पार नेली होती. दुसऱ्या दिवशी भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यानेही छोटी खेळी करत उत्तम फिनिशरची भुमिका पार पाडली. यादरम्यान त्याने वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा (Brian Lara)याचा १९ वर्ष जुना विक्रम मोडला. त्याचे अभिनंदन खुद्द लारा यांनी केले आहे.
बुमराहने भारताच्या पहिल्या डावात दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत चांगले शॉट्स खेळले. या सामन्यात त्याने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. लारा यांनी दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू रॉबिन पीटरसनच्या एका षटकात २८ धावा केल्या होत्या. हा विक्रम मोडल्याने लारा यांनी बुमराहचे ट्वीटरवर अभिनंदन केले आहे.
लारा यांचा हा विक्रम १९ वर्षे कोणत्याच खेळाडूला तोडता आला नाही. मात्र भारताच्या खेळाडूला ते जमले आहे. बुमराहने स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याच्या एका षटकात २९ धावा वसूल केल्या. या षटकात ब्रॉडने एकूण ३५ धावा दिल्या होत्या. त्यामुळे हे षटक कसोटी क्रिकेटमधील आतापर्यंतचे सर्वात महाग षटक ठरले आहे.
हा विश्वविक्रम तुटल्यावर लारा यांनी ट्वीटरवर लिहिले, ‘कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा करत विश्वविक्रम करणाऱ्या जसप्रीत बुमराहचे अभिनंदन करण्यासाठी माझ्यासोबत सामील व्हा. वेल डन!’
Join me in congratulating the young @Jaspritbumrah93 on breaking the record of Most Runs in a Single Over in Tests. Well done!🏆#icctestchampionship #testcricket #recordbreaker pic.twitter.com/bVMrpd6p1V
— Brian Lara (@BrianLara) July 2, 2022
बुमराहने ब्रॉडच्या त्या षटकात चार चौकार आणि दोन षटकार मारले. त्यातील दुसऱ्या चेंडूवर पाच धावा अतिरिक्त मिळाल्या. त्याने या सामन्यात १९३पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने खेळताना १६ चेंडूत नाबाद ३१ धावा केल्या आहेत. भारताचा पहिला डाव ४१६ धावांवर संपुष्टात आला.
इंग्लंडच्या पहिल्या डावात बुमराहने फलंदाजी बरोबरच गोलंदाजीतही विशेष कामगिरी केली आहे. त्याने इंग्लंडचे ऍलेक्स लीज, झॅक क्रॉली आणि ऑली पोप या पहिल्या तीन फलंदाजांना बाद करत संघाला चांगली सुरूवात करून दिली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असता इंग्लंडने पहिल्या डावात ५ विकेट्स गमावत ८५ धावा केल्या आहेत. यामुळे भारतीय संघाकडे ३३२ धावांची भक्कम आघाडी आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय संघासाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या रोहित कधी होतोय टीम इंडियात सामील
‘प्रिय बीसीसीआय, बुमराहला कसोटीचा नियमित कर्णधार बनवा’; चाहत्यांकडून होतेय जोरदार मागणी
‘आम्ही मरू शकत होतो…’, वेस्ट इंडीज दौऱ्यात बांगलादेशच्या संघासोबत नक्की काय घडले?