विराट कोहलीचा खराब फॉर्म इंग्लंडविरुद्धच्या एजबस्टन कसोटीतही कायम राहिला. पहिल्या डावात विराटने ११ धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात २० धावा करून तो बाद झाला. दुसऱ्या डावात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टाकेलल्या एका चेंडूवर विराटने माजी कर्णधार जो रुटच्या हातात विकेट गमावली. स्वस्तात बाद झाल्यानंतर त्याच्यावर मोठ्या प्रामाणात टीका होत आहे, पण यादरम्यान इंग्लंडाचा माजी फिरकी गोलंदाज ग्रीम स्वानने त्याची पाठराखण केली आहे.
दुसऱ्या डावातील ३० व्या षकात बेन स्टोक्स गोलंदाजीसाठी आला होता. स्टोक्सने टाकलेल्या पाचवा चेडू विराटच्या बॅटचा किनारा घेऊन यष्टीरक्षक सॅम बिलिंग्सच्या हातात गेला, पण त्याला हा झेल पकडता आला नाही. परंतु स्लीप्समध्ये माजी कर्णधार जो रुट (Joe Root) उभा होता आणि त्याने चपळाई दाखवत एका हातात उत्कृष्ट झेल पकडला. विराटने जरी स्वस्तात विकेट गमावली असली, तरी इंग्लंडचा माजी फिरकी गोलंदाज ग्रीम स्वान (Graeme Swann) याच्या मते गोलंदाजाने टाकेलला चेंडू देखील जबरदस्त होता.
इंग्लंडच्या माजी फिरकी गोलंदाजाला वाटते की, भारतीय समालोचक अनेकदा विराट कोहली (Virat Kohli) विषयी खूप कठोर वागतात. ग्रीम स्वान (Graeme Swann) म्हणाला की, “तुम्हाला जे हवे आहे ते, तुम्ही बोलू शकता, मला फरक पडत नाही. कसोटी क्रिकेटच्या कोणत्याही युगात जर तुम्ही फलंदाजी करत असाल आणि या चेंडूवर जर तुम्ही वाचलात, तर तुम्ही नशीबवान आहात. हा चेंडू खेळण्यायोग्य नव्हता आणि शेवटी नशीबाने एक झेलही घेतला गेला आहे.”






