भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका जिंकता आली नाही. १ जुलै रोजी सुरू झालेला पाचवा कसोटी सामना मंगळवारी (५ जुलै) इंग्लंडने जिंकला आणि मालिकाही अनिर्णीत केली. भारताकडे तब्बल १५ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची संधी होती, पण हे शक्य होऊ शकले नाही. कसोटी मालिका २-२ अशा बरोबरीवर सुटली.
सामन्याच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी ११९ धावांची आवश्यकता होती. जॉनी बेयरस्टो आणि जो रुटने शेवटच्या दिवशी शतक झळकावले आणि संघाला विजय देखील मिळवून दिला. दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी द्विशतकीय भागीदारीही पार पडली, जी भारताच्या पराभवासाठी सर्वात मोठे कारण ठरले. चला तर पाहूया भारतीय संघाच्या पराभवाची पाच महत्वाची कारणे.
दुसऱ्या डावात बुमराहव्यतिरिक्त नाही चालला दुसरा कोणताच गोलंदाज –
शेवटच्या डावात इंग्लंडला विजयासाठी ३७८ धावांचे लक्ष्य मिळाले होते. इंग्लंडमध्ये आजपर्यंत कोणत्याच संघाने एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना विजय मिळवला नव्हता. पहिल्या डावात २८४ धावांवर सर्वबाद झालेल्या इंग्लंड संघासाठी हे लक्ष्य नक्कीच सोपे नव्हते. पहिल्या डावात जबरदस्त प्रदर्शन केलेल्या भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या डावात चांगली कामगिरी केली नाही. एकट्या जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात २ विकेट्स घेतल्या. भारताचा दुसरा एकही गोलंदाज विकेट घेऊ शकला नाही.
बुमराहने पहिल्या डावात देखील तीन महत्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या. मोहम्मद सिराजने पहिल्या डावात ४ विकेट्स घेतल्या होत्या, पण तो दुसऱ्या डावात अपयशी ठरला आणि त्याने तब्बल ६ च्या इकोनॉमीने धावा खर्च केल्या. तसेच पहिल्या डावात दोन विकेट घेणाऱ्या मोहम्मद शमीने दुसऱ्या डावात ४ च्या इकोनॉमीने धावा खर्च केल्या.
हनुमा विहारीने सोडली बेयरस्टोला स्वस्तात बाद करण्याची संधी –
इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जॉनी बेयरस्टोने सामन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या डावात स्वतःचे शतक पूर्ण केले. त्याचे दुसऱ्या डावातील शतक भारतासाठी खूपच महागात पडले. तसे पाहिले तर यामध्ये भारतीय संघाचीच चूक आहे. कारण बेयरस्टो १४ धावांवर खेळत असताना मोहम्मद सिराजच्या चेंडूवर त्याने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी चेंडू त्याच्या बॅटला लागून स्लिप्समध्ये उभ्या असलेल्या हनुमा विहारीच्या हातात गेला होता, पण त्याच्याकडून झेल सुटला. विहारीच्या चुकीची किंमत पुढे भारतीय संघाने मोजली.