न्यूझीलंड संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. उभय संघातील कसोटी मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना लीड्समध्ये खेळला जात आहे. न्यूझीलंडने पहिल्या डावात ३०० पार धावसंख्या उभी केली आहे, ज्यामध्ये त्याच्या डॅरिल मिचेलने शतकाचे योगदान दिले. संपूर्ण मालिकेत मिचेल चांगले प्रदर्शन करत आला आहे आणि हे त्याचे मालिकेतील तिसरे शतक ठरले आहे. शेवटच्या सामन्यात केलेल्या शतकाच्या जोरावर त्याने सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये अष्टपैलू डॅरिल मिचेल (Daryl Mitchell) याच्या नावावर दोन शतकांची नोंद होती. अशात तिसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात देखील त्याने पुन्हा एक शतक ठोकले आणि मोठा विक्रम घडवला. यावेळी त्याने २२८ चेंडू खेळले, ज्यामध्ये ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १०९ धावा केल्या. या शतकाच्या मदतीने त्याने वेस्ट इंडीजचा माजी दिग्गज एस चंद्रपाल (Shivnarine Chanderpaul), तर भारताच्या सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि मोहम्मद अजहरुद्दीन (Mohammad Azharuddin) यांना एका खास यादीत मागे टाकले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या पाच डावांमध्ये डॅरिल मिचेलने तीन शतक आणि एक अर्धशतक ठोकले आहे. या प्रदर्शानानंतर त्याच्या नावावर या मालिकेत आतापर्यंत ४८२ धावांची नोंद झाली आहे. आता मिचेल इंग्लंडमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळताना सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. या यादीत सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये दक्षिण आफ्रिकी दिग्गज हाशिम आमला (Hashim Aamla) आणि डॅरिल मिचेल आता संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत. या दोघांनी इंग्लंडमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळताना प्रत्येकी ४८२ धावांचे योगदान दिले आहे, जे इतरांच्या तुलनेत जास्त आहे.
वेस्ट इंडीजच्या एस चंद्रपालने २००७ साली इंग्लंडमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती, ज्यामध्ये त्यांनी ४४६ धावा केल्या होत्या. तर सचिन तेंडुलकर आणि अजहरुद्दीन यांनी इंग्लंमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळताना अनुक्रमे ४२८ आणि ४२६ धावा केल्या होत्या.
इंग्लंडमध्ये तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
४८२ – हाशिम आमला (२०१२)
४८२ – डॅरिल मिचेल (२०२२)
४४६ – एस चंद्रपाल (२००७)
४२८ – सचिन तेंडुलकर (१९९६)
४२६ – मोहम्मद अजहरुद्दीन (१९९०)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘भारतावर मात, आशिया चषक ताब्यात’, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचे सुचक विधान
आयर्लंड की इंग्लंड? ‘दादां’चे ठरलंय कोणता सामना पाहायला जायचं ते