इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यादरम्यान सुरू असलेल्या कसोटीचा दुसरा दिवस दोन्ही संघांसाठी संमिश्र ठरला. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात पाहुण्या न्यूझीलंडने भलीमोठी धावसंख्या रचून सामन्यावर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. मात्र खराब सुरुवातीनंतर सावरत इंग्लंडने पुनरागमन केले. पदार्पण करत असलेल्या न्यूझीलंडच्या डेवॉन कॉनवेचे द्विशतक दुसऱ्या दिवसाचे खास आकर्षण ठरले.
न्यूझीलंडची मोठी धावसंख्या
पहिल्या दिवशीच्या ३ बाद २४६ यादव संख्येवरून न्यूझीलंडसाठी नाबाद फलंदाज डेवॉन कॉनवे व हेन्री निकोल्स यांनी सुरुवात केली. निकोल्सने लवकरच अर्धशतक तर, कॉनवेने दीडशतक पूर्ण केले. निकोल्स वैयक्तिक ६१ धावा करून मार्क वूडच्या गोलंदाजीवर बाद झाला. दोघांनी मिळून चौथ्या गड्यासाठी १७४ धावा जोडल्या. निकोल्स बाद झाल्यानंतर न्यूझीलंडची वाताहात झाली व त्यांनी झटपट ४ बळी गमावले. अखेरचा फलंदाज नील वॅग्नर याने कॉनवेला साथ दिली. कॉनवेने वूडच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत आपले द्विशतक पूर्ण केले. मात्र, पुढील षटकात तो धावबाद झाला आणि न्यूझीलंडचा डाव ३७८ धावांवर आटोपला. इंग्लंडसाठी पदार्पण करणाऱ्या ओली रॉबिन्सनने ४ तर, मार्क वूडने ३ बळी मिळवले. अनुभवी जेम्स अँडरसनला दोन बळी घेण्यात यश आले.
खराब सुरुवातीनंतर इंग्लंडचे पुनरागमन
न्यूझीलंडने रचलेल्या ३७८ धावांच्या प्रत्युत्तरादाखल इंग्लंडची सुरुवात खराब झाली. कायले जेमिसनने डॉम सिब्लीला खातेही न खोलू देता तंबूत पाठवले. पाठोपाठ टीम साऊदीने झॅक क्राऊलीला २ धावांवर बाद केले. २ बाद १८ अशी अवस्था असताना रॉरी बर्न्स व कर्णधार जो रूट यांनी संघाचा डाव सावरला. दिवसाअखेर आणखी एकही गडी बाद न होऊ देता त्यांनी इंग्लंडची धावसंख्या १११ पर्यंत नेली. बर्न्स वैयक्तिक ५९ तर, रूट ४२ धावांवर खेळत आहे.
कॉनवेची ऐतिहासिक खेळी
डेवॉन कॉनवेने धमाकेदार द्विशतक झळकावत दुसरा दिवस आपल्या नावे केला. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच न्यूझीलंडचा खेळाडू बनला. सलामीवीर म्हणून येऊन अखेरपर्यंत नाबाद राहण्याचा विक्रम मात्र तो करू शकला नाही व २०० धावांवर धावबाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी पदार्पणात द्विशतक करत कॉनवे आला ‘या’ फ्रँचायझीच्या नजरेत, गाजवणार आयपीएलचं मैदान?
धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर ‘असे’ होते सीएसके संघातील वातावरण, ऋतुराजने केला खुलासा
आयपीएल २०२१च्या उर्वरित हंगामात ‘अशी’ असेल सर्व फ्रँचायझींची प्लेइंग इलेव्हन