इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेला न्यूझीलंड संघ तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. यातील लॉर्ड्सवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात यजमान संघाने बाजी मारली. दुसऱ्या कसोटी सामन्यात केन विलियमसन अनुपस्थितीत असल्याने न्यूझीलंडचा संघ टॉम लॅथमच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. या सामन्यात पहिल्या पराभवाने निराश न होता न्यूझीलंडने पहिल्या डावात ५५३ धावांचा डोंगर उभारला आहे. यामध्ये यष्टीरक्षक-फलंदाज टॉम ब्लंडेलने शतकी खेळी करत विक्रम रचला आहे.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकत न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. उत्तम सुरूवात करताना न्यूझीलंडचे चार फलंदाज बाद झाल्यावर टॉमने डॅरिल मिचेल (Darly Mitchell) याच्या साथीने संघाला भक्कम धावसंख्या उभारण्यात मदत केली आहे. त्यांनी पाचव्या विकेटसाठी २३६ धावांची ऐतिहासिक भागीदारी केली आहे.
नॉटिंघम येथे खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात टॉमने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येताना १०६ धावा केल्या आहेत. याबरोबरच त्याने कसोटीत इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध एका डावात सर्वाधिक धावा करणारा न्यूझीलंडचा पहिला यष्टीरक्षक-फलंदाज होण्याचा मान पटकावला आहे. याबाबतीत त्याने न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू आणि इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम (Brendon McCullum) याला मागे टाकले आहे.
मॅक्युलमने २००८मध्ये लॉर्ड्सवर झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध ९७ धावा केल्या होत्या. त्याकाळी तो इंग्लंडच्या मैदानावर कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणारा पहिलाच यष्टीरक्षक-फलंदाज ठरला होता. त्याचा हा विक्रम टॉमने मागे तर टाकलाच त्याचबरोबर तो शतक करणारा पहिला यष्टीरक्षक-फलंदाजही ठरला आहे.
टॉमने या मालिकेत झालेल्या पहिल्या सामन्यातच मॅक्युलमच्या १८ वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी केली होती. त्याने ९६ धावा केल्या होत्या. २००४च्या लॉर्ड्स कसोटीमध्ये मॅक्युलमने दुसऱ्या डावात ९६ धावा केल्या होत्या.
नॉटिंघमच्या सामन्यात टॉम बरोबरच डॅरिलने शतक केले आहे. त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत १९० धावा केल्या आहेत. यामध्ये विल यंगने ४७, डेवॉन कॉनवेने ४६ आणि मायकल ब्रेसवेल याने ४९ धावा केल्याने संघाने पहिल्या डावात ५५३ धावा केल्या आहेत.
इंग्लंडने पहिल्या डावात झॅक क्राऊलीची विकेट लवकर गमावली आहे. तर ऍलेक्स लीज ३४ आणि ओली पोप ५१ धावा करत खेळपट्टीवर खेळत आहेत. इंग्लंडने पहिल्या डावात एक विकेट गमावत ९० धावा केल्या आहेत.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कसोटी पदार्पणावेळी वडील होते इंग्लंडचे प्रशिक्षक, आता त्याच संघाविरुद्ध ठोकली सलग २ शतके
आशिष नेहराने जेव्हा संघ सहकाऱ्याला दिला होता आपला ‘सामनावीर’ पुरस्कार, वाचा असे प्रसंग
स्लेजिंगचे बादशाह समजले जाणारे पाकिस्तानी दिग्गज, खरं तर क्रिकेटचे आर्य चाणक्य होते!





