इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 21 ते 24 ऑगस्ट दरम्यान मँचेस्टर येथे खेळला गेला. ज्यामध्ये इंग्लंडने शानदार कामगिरी करत श्रीलंकेच्या संघाचा 5 विकेट राखून पराभव केले. त्यासोबतच मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. इंग्लंडला यशस्वीपणे लक्ष्यापर्यंत नेण्याचे काम अनुभवी फलंदाज जो रूटने केले, ज्याने शानदार खेळी करत आपल्या संघाला विजयापर्यंत नेले. रुटने आपल्या अर्धशतकी खेळीसह एक विशेष विक्रम आपल्या नावे केला आहे.आता तो कसोटीत सर्वाधिक अर्धशतके करणारा तिसरा फलंदाज बनला आहे.
श्रीलंकेने दिलेले 205 धावांचे लक्ष्य इंग्लंडने 5 विकेट गमावून पूर्ण केले. ज्यामध्ये जो रूटने महत्त्वाची भूमिका बजावली. रुटने अतिशय सावध खेळी खेळली. त्याने 128 चेंडूंचा सामना करत दोन चौकारांच्या मदतीने नाबाद 62 धावा केल्या आणि इंग्लंडला विजयाकडे नेले. रूटचे हे कसोटी फॉरमॅटमधील 64 वे अर्धशतक होते. आता या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक अर्धशतक ठोकण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. रूटने आतापर्यंत 144 सामने खेळले असून 163 डावांमध्ये हा टप्पा गाठला आहे. अशाप्रकारे जो रूटने आता भारताचा राहुल द्रविड आणि ऑस्ट्रेलियाच्या ॲलन बॉर्डरला मागे टाकले आहे. द्रविड आणि बॉर्डरने त्यांच्या कसोटी कारकिर्दीत 63-63 अर्धशतके झळकावली होती. आता हे दोन्ही दिग्गज मागे पडले आहेत.
कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक अर्धशतकं झळकावणाऱ्या फलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर आणि शिवनारायण चंद्रपॉल दुसऱ्या स्थानावर आहे. सचिनने 68 अर्धशतके आणि चंदरपॉलने 66 अर्धशतके केली आहेत. आगामी काळात या दोघांना मागे टाकण्याचीही रूटला संधी असेल.
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, श्रीलंकेने पहिल्या डावात 236 धावा केल्या, ज्याला प्रत्युत्तरात इंग्लंडने 358 धावा केल्या आणि 122 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. त्यांच्या दुसऱ्या डावात श्रीलंकेने 326 धावा केल्या आणि इंग्लंडला विजयासाठी 205 धावांचे लक्ष्य दिले, जे यजमानांनी पाच विकेट्स राखून पूर्ण केले. आता या दोन्ही संघांमधील मालिकेतील दुसरी कसोटी 29 ऑगस्टपासून लॉर्ड्सवर खेळवली जाणार आहे, जी जिंकून इंग्लंडला मालिका काबीज करायची आहे. तर श्रीलंका संघ पुनरागमन करून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.
हेही वाचा-
“हा खेळाडू भविष्यात रविचंद्रन अश्विनसाठी योग्य पर्याय…”, माजी क्रिकेटपटूचा मोठा अंदाज
श्रीलंकेला हरवून इंग्लंडने WTC गुणतालिकेत घेतली झेप, भारताचा नुकसान झाला का?
9 षटकारांसह 27 चेंडूत 70 धावा, गुजरातच्या स्टार खेळाडूचा सामन्यात कहर