मुंबई । इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन यांची गुरुवारी अचानक प्रकृती बिघडली असल्याची माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली आहे. त्यामुळे त्याची पुन्हा तपासणी करण्यात आली आहे.
सॅम करनला डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. आज सकाळी त्याची कोरोना टेस्टदेखील करण्यात आली. प्रकृती बिघडल्याने त्याने स्वतःला एजेस बाऊल येथील हॉटेलमध्ये आयसोलेट केले आहे. त्यामुळे आता तो इंग्लंडच्या सराव सत्रात सहभागी होणार नाही.
सॅम करनने सराव सामन्याच्या पहिल्याच दिवशी पंधरा धावा काढून बाद झाला. वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या तयारीसाठी हा सराव सामना खेळवण्यात येत आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात पहिला कसोटी 8 जुलै रोजी हा सामना साउथॅप्टन येथे होणार आहे.
कोरोना व्हायरसच्या सावटात पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचे पुनरागमन होणार आहे. मार्च महिन्यापासून एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा सामना झाला नाही. आरोग्याची योग्य ती खबरदारी घेत आता वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडूंच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी इंग्लंड क्रिकेट संघ श्रीलंकेच्या दौऱयावर कसोटी मालिका खेळण्यासाठी गेला होता. मात्र कोणताही सामना न खेळता तो मायदेशी परतला.
22 वर्षीय सॅम करन ने इंग्लंड संघाकडून क्रिकेट खेळताना 17 कसोटी सामन्यात 37 बळी टिपले तर 4 वनडेत त्याच्या नावावर 2 बळींची नोंद आहे. तसेच कसोटीत 711 धावा काढल्या आहेत तर वनडेत 24 धावांची नोंद आहे.