मागील काही महिन्यांपासून भारतासह जगभरातील कित्येक देश कोरोना व्हायरस महामारीमुळे त्रस्त झाले आहेत. मात्र आता वैज्ञानिकांनी कोरोना प्रतिबंधक लस शोधली असल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. परंतु कोरोनाची ही लस घेतल्याने त्याचे दुष्परिणाम होतात, अशा वृत्तांमुळे सर्वसामान्य लोक ही लस घेण्यास नकार देत आहेत. अगदी ब्रिटेनमध्येही कोरोना लस घेणाऱ्या लोकांची संख्या कमी आढळून आली आहे. अशात इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अली याने लोकांना अफवांवर लक्ष न देता कोरोनाची लस घेण्याची मागणी केली आहे.
मोईन अलीने सांगितले कोरोना लसीचे महत्त्व
एका व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत बोलताना तो बोलत होता. मोईन अली म्हणाला की, “सद्यपरिस्थिती लक्षात घेता मी कोरोनाची लस नक्की घेईन आणि लोकांनाही यासाठी विनंती करेन. मी कोरोना लसीसंदर्भात पूर्ण माहिती असलेल्या तज्ञ लोकांशी चर्चा केली आहे. त्यामुळे मी नक्कीच ही लस टोचून घेईल आणि माझ्या कुटुबींयांनाही असे करण्यास सांगितले.”
“कोरोनाची लस ही इतर साधारण लसींसारखीच आहे. परंतु माध्यमांवर यासंदर्भात वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. परंतु लोकांनी घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. कारण हे एक प्रकारचे औषध आहे, ज्यामुळे आपला विकास होण्यास मदत होणार आहे. माझ्या समुदायातील काही लोक या लसीसंदर्भात गैरसमजूतीत आहेत. परंतु सर्वांनी कोरोनाची लस टोचून घेतल्याशिवाय परिस्थिती पुर्वीप्रमाणे सामान्य होणार नाही”, असे पुढे बोलताना मोईन अलीने सांगितले.
मोईन अलीला झाली होती कोरोनाची लागण
इंग्लंडचा क्रिकेटपटू मोईन अली हा पाकिस्तानी मूळ असलेला ब्रिटिश नागरिक आहे. काही दिवसांपुर्वी इंग्लंड संघासोबत श्रीलंका दौऱ्यावर असताना तो कोरोनाच्या विळख्यात सापडला होता. त्याच्यामध्ये कोरोनाची अधिक लक्षणे आढळली नव्हती. तरीही त्याला १३ दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले होते. नुकत्याच भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघाचा तो भाग आहे.
फेब्रुवारीत सुरू होणार भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका
ऑस्ट्रेलिया दौरा आटोपून आता भारतीय संघ मायदेशात इंग्लंडविरुद्ध कसोटी, वनडे आणि टी२० मालिका खेळणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दौऱ्याची सुरुवात ५ फेब्रुवारीपासून चेन्नई येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याने होणार आहे. या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना १२ फेब्रुवारीपासून चेन्नईतच खेळविण्यात येणार आहे. तर अखेरचे दोन सामने अहमदाबादच्या नवीन मोटेरा मैदानावर खेळवले जातील.
महत्त्वाच्या बातम्या-
“…म्हणून धावा काढण्यापेक्षा चेंडू खेळून काढणे महत्वाचे असते”, चेतेश्वर पुजाराचे रोखठोक मत
‘नमों’नी भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरीचं केलं कौतुक, रवी शास्त्री म्हणाले…