क्रिकेटच्या पंढरीत इंग्लंड संघाने ऐतिहासिक धावसंख्या उभारली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना खेळवला जात आहे. या सामन्याची नाणेफेक जिंकत इंग्लंडने जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि हा निर्णय योग्य असल्याचं फलंदाजांनी सिद्ध केलं. इंग्लंडने लॉर्ड्सच्या मैदानावर 387 धावांची विश्वविक्रमी धावसंख्या उभारली.
इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 3 बाद 387 धावा केल्या आहेत. यासह भारताला अखेरचा वनडे सामना जिंकत मालिका विजयासाठी 388 धावा करण्याचं आव्हान दिलं आहे. बेन डकेट व जेकब बेथल यांनी संघाला विक्रमी सुरूवात करून दिली, त्यानंतर डकेटने शतक झळकावलं. तर जोस बटलर व जो रूट यांनी कमालीचा शेवट करून दिला.
क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच लॉर्ड्सच्या मैदानावर वनडे क्रिकेटमध्ये सर्वाेच्च धावसंख्या रचणारा इंग्लंड हा जगातील पहिला संघ ठरला आहे. याशिवाय लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडसाठी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या बेन डकेटने रचली आहे. बेन डकेटने या सामन्यात 141 धावांची खेळी साकारली आहे. तर जेकब बेथेल व बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी 192 धावांची विक्रमी भागीदारी रचली. एकंदरीत या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडच्या फलंदाजांनी आपला दबदबा कायम राखला.
जसप्रीत बुमराह नसल्याने भारताच्या अननुभवी गोलंदाजांची इंग्लंडच्या टॉप-5 फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली. सलामीसाठी आलेल्या बेन डकेट व जेकब बेथेलच्या जोडीने 192 धावांची भागीदारी रचली. बेन डकेटने 135 चेंडूत 18 चौकार व एका षटकारासह 141 धावांची विक्रमी खेळी साकारली. तर जेकब बेथेलने 93 चेंडूत 11 चौकार व 2 षटकारांसह 91 धावा केल्या. यानंतर कमालीच्या फॉर्मात असलेल्या जो रूटने 48 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 74 धावांची खेळी केली. हॅरी ब्रूक 14 धावांची खेळी करत बाद झाला. तर जोस बटलरने 13 चेंडूत 4 चौकार व 3 षटकारांसह 41 धावांची खेळी केली. यासह इंग्लंडने 387 धावा केल्या.
भारताच्या गोलंदाजांनी लाजिरवाणी कामगिरी केली. अर्शदीप सिंगने 10 षटकांत 72 धावा दिल्या. तर प्रसिध कृष्णाने 10 षटकांत 2 विकेट्स घेत 69 धावा दिल्या. तर प्रिन्स यादवने 10 षटकांत 1 विकेट घेत 79 धावा दिल्या. तर गुरनूर ब्रारची इंग्लंडच्या गोलंदाजांनी धुलाई करत 10 षटकांत 9.70 च्या इकॉनॉमीने 97 कुटल्या. तर अक्षर पटेलने 61 धावा दिल्या.





