भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेदरम्यान इंग्लंडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) देण्याच्या नीति विरोधात इंग्लंडचे प्रमुख खेळाडू ‘द हंड्रेड’ या स्पर्धेवर बहिष्कार टाकू शकतात. खेळाडूंना दुसऱ्या देशातील फ्रॅन्चाईजी क्रिकेट खेळण्यासाठी त्यांच्या देशाच्या क्रिकेट बोर्डाकडून ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक असतं.
‘द टेलिग्राफ’च्या रिपोर्टनुसार, ईसीबीनं गेल्या आठवड्यात अशा स्पर्धांसाठी एनओसी जाहीर न करण्याचा निर्णय घेतला होता, ज्या स्पर्धांची तारीख इंग्लंडच्या देशांतर्गत हंगामासोबत जुळते. मात्र यातून अशा खेळाडूंना सूट मिळेल, ज्यांचा त्यांच्या काऊंटी टीमशी फक्त मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा करार आहे.
रिपोर्टनुसार, एनओसीसाठी आवश्यक विदेशी स्पर्धांच्या लिस्टमध्ये इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएलचं नाव नाही. मात्र यामध्ये पाकिस्तान सुपर लीगचा समावेश आहे. असं बोललं जात आहे की, खेळाडूंना ‘द हंड्रेड’ स्पर्धेच्या तारखांशी जुळणाऱ्या कोणत्याही स्पर्धेसाठी एनओसी मिळणार नाही. या स्पर्धांच्या लिस्टमध्ये मेजर लीग क्रिकेट (अमेरिका), कॅनडा ग्लोबल टी20 लीग, लंका प्रीमियर लीग आणि कॅरेबियन प्रीमियर लीग यांसारख्या स्पर्धांचा समावेश आहे.
रिपोर्टमध्ये पुढे दावा केला गेला आहे की, इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयाविरोधात इंग्लंडचे प्रमुख 50 खेळाडू इंग्लंड क्रिकेट बोर्डाद्वारे आयोजित ‘द हंड्रेड’ या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा विचार करत आहेत. मात्र या खेळाडूंमध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या संघाच्या कोणत्या खेळाडूचा समावेश आहे का, हे अद्याप स्पष्ट नाही. जर इंग्लंडच्या प्रमुख खेळाडूंनी स्पर्धेवर बहिष्काराचं पाऊल उचललं, तर त्यावर ईसीबी कोणता निर्णय घेते, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा –
“अशा सेलिब्रेशनची गरज नाही”, सुनील गावस्करांनी सिराजला फटकारले
रिषभ पंत कसोटीतही आयपीएल प्रमाणे फलंदाजी करतो! विचित्र शॉट्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
रोहित शर्मा सहाव्या क्रमांकावरही फ्लॉप! बोल्ड होण्याचा नवा विक्रम बनवला





