128 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन करणार आहे. 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट सामने टी20 फाॅरमॅटमध्ये खेळवले जाईल. पण जगभरातील फक्त 6 संघच या क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरू शकतील अशी घोषणाही करण्यात आली आहे. दरम्यान, ग्रेट ब्रिटन संघ ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन करणार असल्याची एक खूप मोठी बातमी समोर आली आहे. या मुद्द्यावर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) आणि स्कॉटलंड क्रिकेट बोर्ड यांच्यात चर्चा सुरू आहे.
स्कॉटलंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ट्रुडी लिंडब्लाड यांनी इंग्रजी माध्यम चॅनेल बीबीसीशी बोलताना सांगितले की, स्कॉटलंड क्रिकेट व्यवस्थापन ईसीबीशी खूप चांगले संबंध राखत आहे. दोन्ही संघ ऑलिम्पिकमध्ये ‘टीम ग्रेट ब्रिटन’ तयार करण्यासाठी एकत्र येण्याचा विचार करत आहेत.
जर आपण सध्याच्या आयसीसी रँकिंगवर नजर टाकली तर, इंग्लंड पुरुषांच्या टी20 रँकिंगमध्ये दुसऱ्या आणि महिलांच्या रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. पण स्कॉटलंडचा पुरुष आणि महिला संघाचा रँकिंगमध्ये टॉप-10 मध्येही समावेश नाही. या संदर्भात, ट्रुडी लिंडब्लाड म्हणाल्या, “या स्पर्धेत फक्त 6 संघ सहभागी होतील, त्यामुळे टीम ग्रेट ब्रिटनची संकल्पना आम्हा दोघांच्याही हिताची असेल.”
स्कॉटलंड बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी असेही उघड केले की, ईसीबी अधिकाऱ्यांनी या नवीन योजनेबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बाळगला आहे. त्यांनी असेही सांगितले की इंग्लंड आणि वेल्स 2026 मध्ये आणि नंतर पुन्हा 2030 मध्ये विश्वचषक स्पर्धा आयोजित करणार आहेत. दरम्यान, लॉस एंजेलिस ऑलिम्पिक एक नवीन संधी म्हणून उदयास आले आहे.






