इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केले असून, जबरदस्त कामगिरी केली आहे. यावरून त्याच्यात अजून क्रिकेट बाकी आहे हे दर्शवते. त्याने वनडे कप 2026 मध्ये मंगळवारी (21 जुलै) डरहमकडून खेळताना डर्बीशायरविरुद्ध नाबाद शतकी खेळी करत संघाचा विजयात महत्त्वाचे योगदान दिले.
गेल्या 12 वर्षांत स्टोक्सने डरहमसाठी लिस्ट ए सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यात त्याने केलेली कामगिरी खूपच उल्लेखनीय ठरली.
स्टोक्सच्या 123 चेंडूंत नाबाद 108 धावा
या सामन्यात डर्बीशायरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी डरहमला 257 धावसंख्येचे लक्ष्य दिले. 2023 च्या विश्वचषकानंतर आपला पहिलाच 50 षटकांचा सामना खेळताना स्टोक्सने लक्ष्याचा पाठलाग करताना नाबाद शतकी खेळी केली.
स्टोक्सने 123 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि 3 षटकारांच्या सहाय्याने नाबाद 108 धावा केल्या. त्याच्या या कामगिरीमुळे डरहमने 49.1 षटकांत 5 विकेट्स गमावत लक्ष्य गाठले.
स्टोक्सचे हे लिस्ट ए कारकिर्दीतील 10 वे शतक ठरले. तसेच 2014 नंतर त्याने डरहमसाठी केलेले पहिले लिस्ट ए शतक ठरले. त्याने एका दशकानंतर पुनरागमन केले आहे. त्याच्या खेळीने त्याने एकप्रकारे सिद्ध केले की फॉरमॅट कोणताही असो, त्याची सामना जिंकण्याची क्षमता काही कमी झालेली नाही.
स्टोक्सने द हंड्रेड 2026 ऐवजी वनडे कप खेळण्याचा निर्णय घेतला, जे खूपच आश्चर्यकारक आहे.
स्टोक्सची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
इंग्लंडच्या माजी कर्णधाराने जून महिन्यात घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय निवृत्ती घेतली. त्या सामन्याचा चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्याआधी त्याने आपल्या संघसहकाऱ्यांना ड्रेसिंग रूममध्ये त्याच्या निवृत्तीचा निर्णय सांगितला.
या कसोटी मालिकेत इंग्लंडचा 1-2 असा धक्कादायक पराभव झाला. पहिला सामना जिंकल्यानंतर यजमान संघाने उर्वरित दोन सामन्यांमध्ये निराशाजनक कामगिरी केली.
स्टोक्सने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत उत्तम कामगिरी केली आहे. त्याने 122 कसोटी सामन्यांमध्ये 7273 धावा करत 252 विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच त्याने 114 वनडे सामन्यांमध्ये 3463 धावा आणि 74 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. त्याने इंग्लंडच्या पहिल्या-वहिल्या वनडे विश्वचषक (2019) विजयामध्येही लक्षवेधी कामगिरी केली होती.
स्टोक्सने 43 आंतरराष्ट्रीय टी 20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 935 धावा केल्या आणि 26 विकेट्स घेतल्या. (England Domestic One-Day Cup 2026 playinf for Durham Ben Stokes score match winning century vs Derbyshire)






