आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांवरील निराशाजनक कामगिरी मागे टाकून भारतीय संघ आता पुढे पाहण्याच्या तयारीत आहे. सलग पराभवानंतर, नवीन सुरुवात करण्याच्या निर्धाराने टीम इंडिय’ झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे. 23 जुलै रोजी हरारे स्पोर्ट्स क्लबवर होणाऱ्या पहिल्या टी-20 सामन्यात सर्वांच्या नजरा 15 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीवर असतील, त्याला आपली क्षमता सिद्ध करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.
इंग्लंड दौऱ्यावर तीन सामने खेळल्यानंतर संघातून वगळण्यात आलेल्या वैभव सूर्यवंशीला या मालिकेत प्लेइंग इलेव्हनमध्ये परतण्याची चांगली संधी आहे. संजू सॅमसन संघात नसल्यामुळे, वैभव अभिषेक शर्मासोबत डावाची सुरुवात करेल अशी अपेक्षा आहे.
हा सामना भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरसाठीही अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कर्णधार म्हणून त्याच्या कार्यकाळाची सुरुवात खूप कठीण झाली आहे. त्यामुळे, कर्णधार म्हणून आपला आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासाठी अय्यरसाठी झिम्बाब्वेविरुद्धचा हा सामना एक महत्त्वाची संधी आहे.
मधल्या फळीत, ईशान किशन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची शक्यता आहे. इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यांवरील त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती, त्यामुळे या मालिकेत आपला फॉर्म परत मिळवण्याचे त्याचे ध्येय असेल.
कर्णधार श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल, तर उपकर्णधार तिलक वर्मा पाचव्या क्रमांकावर महत्त्वपूर्ण खेळी करेल अशी अपेक्षा आहे. अलीकडेच आपल्या स्ट्राइक रेटबाबत टीका सहन करणाऱ्या तिलकाला आपल्या फलंदाजीच्या कामगिरीतून उत्तर देण्याची संधी मिळेल.
सहाव्या क्रमांकावर रिंकू सिंगचे पुनरागमन जवळपास निश्चित मानले जात आहे. 2026च्या टी-20 विश्वचषकाच्या दरम्यान त्याला संघाबाहेर बसावे लागले होते आणि त्यानंतर इंग्लंड व आयर्लंड दौऱ्यांसाठी त्याची निवड झाली नव्हती. आता, दीर्घ प्रतीक्षेनंतर तो पुन्हा भारतीय जर्सीमध्ये दिसू शकतो. अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेचाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे.
भारत गोलंदाजीचे नवीन संयोजन मैदानात उतरवू शकतो. देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी करणारा हर्ष दुबे याला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.
दुखापतीमुळे बराच काळ मैदानाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज मयंक यादव जवळपास दोन वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन करू शकतो. प्रिन्स यादवचे स्थान कायम राहण्याची शक्यता आहे, तर वेगवान गोलंदाजीच्या अंतिम जागेसाठी अशोक शर्मा आणि यश ठाकूर यांच्यात चुरस असेल. मात्र, संघाने अतिरिक्त फिरकीपटूला खेळवण्याचा निर्णय घेतल्यास, दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आलेल्या रवी बिश्नोईलाही संधी मिळू शकते.
झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यासाठी भारताचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), रिंकू सिंग, शिवम दुबे, हर्ष दुबे, प्रिन्स यादव, अशोक शर्मा/यश ठाकूर, मयंक यादव.






