लंडन। इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात रविवारी (६ जून) २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पार पडला. लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर झालेला हा सामना अनिर्णित राखण्यात इंग्लंड संघाला यश मिळाले. मात्र, असे असले तरी त्यांच्याकडून या सामन्यात एक चूक झाली, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने त्यांच्यावर कारवाई केली आहे.
या सामन्यादरम्यान इंग्लंडने षटकांची गती कमी राखल्याने खेळाडूंना सामना फीच्या ४० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. या सामन्याचे सामनाधिकारी असलेले ख्रिस ब्रॉड यांनी ही कारवाई लागू केली आहे. इंग्लंडने निर्धारित वेळेच्या आत षटके पूर्ण केले नाहीत. त्यांना २ षटके टाकण्यास उशीर झाला. त्यामुळे इंग्लंडला या कारवाईला सामोरे जावे लागले आहे.
आयसीसीच्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार षटकांची गती कमी राखल्याबद्दल शिक्षा सुनावली जाते. निर्धारित वेळेपेक्षा उशीर झालेल्या प्रत्येक षटकासाठी सामना फीच्या २० टक्के दंड अशी शिक्षा सुनावली जाते.
इंग्लंडचा कर्णधार जो रुटने त्यांची चूक मान्य केली असून दंडही मान्य केला आहे. त्यामुळे याबद्दल अधिकृत सुनावणी होणार नाही.
इंग्लंडने सामना राखला अनिर्णित
लॉर्ड्स कसोटीच्या पाचव्या दिवशी इंग्लंडसमोर विजयासाठी २७३ धावांचे आव्हान होते. पण दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने दुसऱ्या डावात ३ बाद १७० धावा करत हा सामना अनिर्णित राखला. त्यांच्याकडून दुसऱ्या डावात डॉमनिक सिब्लीने सर्वाधिक नाबाद ६० धावांची खेळी केली होती. तसेच इंग्लंडचा कर्णधार जो रुटने ४० धावांची खेळी केली होती. न्यूझीलंडकडून निल वॅगनरने २ आणि टीम साऊथीने १ विकेट घेतली होती.
तत्पूर्वी न्यूझीलंडने दुसरा डाव शेवटच्या दिवशी ६ बाद १६९ धावांवर घोषित केला होता. तसेच पहिल्या डावात घेतलेल्या १०३ धावांच्या आघाडीसह इंग्लंडसमोर २७३ धावांचे आव्हान ठेवले होते. या डावात न्यूझीलंडकडून टॉम लॅथमने सर्वाधिक ३६ धावांची खेळी केली होती. तर इंग्लंडकडून ऑली रॉबिन्सनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या होत्या.
पहिल्या डावात न्यूझीलंडने डेवॉन कॉनवेच्या द्विशतकाच्या जोरावर ३७८ धावा केल्या होत्या. तर इंग्लंडला पहिल्या डावात रॉरी बर्न्सच्या शतकानंतरही २७५ धावा करण्यातच यश आले होते. त्यामुळे न्यूझीलंडने १०३ धावांची आघाडी घेतली होती. पहिल्या डावातही इंग्लंडकडून रॉबिन्सनने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या होत्या. तर न्यूझीलंडकडून टीम साऊथीने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
पुढील महिन्यात भारतीय संघ जाणार श्रीलंका दौऱ्यावर, पाहा संपूर्ण वेळापत्रक