इंग्लंड आणि भारत यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना मॅंचेस्टर येथे खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २५९ धावा जमविल्या. भारतासाठी हार्दिक पंड्या व युझवेंद्र चहल यांनी शानदार गोलंदाजी केली. भारतीय गोलंदाजांचा या कामगिरीनंतर इंग्लंड संघावर तब्बल सात वर्षानंतर एक नामुष्की आली आहे.
भारताची भेदक गोलंदाजी
मालिका एक-एक अशा बरोबरीत असताना भारताने अखेरचा सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना सादर केला. मोहम्मद सिराजने दुसऱ्या षटकात दोन गडी बाद करत दमदार सुरुवात करून दिली. मध्यमगती वेगवान गोलंदाज व अष्टपैलू हार्दिक पंड्याने चार प्रमुख फलंदाज बाद केले. पंड्याने आपल्या वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली. त्यानंतर अष्टपैलू रवींद्र जडेजाने एक बळी टिपला. चहलने इंग्लंडचे शेपूट गुंडाळत तिघांना माघारी पाठवले. त्यामुळे इंग्लंडचा २५९ धावांमध्ये पाडाव झाला.
इंग्लंडवर आली वाईट वेळ
इंग्लंड संघ सध्या वनडे विश्वविजेता आहे. ओएन मॉर्गनच्या नेतृत्वात संघाने २०१५ पासून उत्कृष्ट कामगिरी केली होती. या संघाने २०१५ ते २०२२ या काळात खेळलेल्या सर्वच्या सर्व वनडे मालिकांतील कमीत कमी एका सामन्यात त्यांनी ३०० पेक्षा जास्त धावा काढल्या होत्या. मात्र, भारताविरुद्धच्या या मालिकेत त्यांना अशी कामगिरी करता आली नाही. ओव्हल येथील पहिल्या सामन्यात ते अवघ्या ११० धावांवर सर्वबाद झाले होते. त्यानंतर, दुसऱ्या सामन्यात २४६ व अखेरच्या सामन्यात २५९ धावा त्यांनी केल्या. या मालिकेत जोस बटलर प्रथमच इंग्लंडचे नेतृत्व करत आहे. यापूर्वी ओएन मॉर्गनने २०१५ पासून २०२२ पर्यंत इंग्लंडचे नेतृत्व केले होते. त्यामुळे सात वर्षापासून सुरू असलेली ३०० धावांची परंपरा बटलर कर्णधार होताच पहिल्या सामन्यात मोडीत निघाल्याचे चाहते म्हणताना दिसत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
तब्बल ३२ वर्षांनंतर वाढणार भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचा रोमांच, २०२३-२७ पर्यंत असा असेल कार्यक्रम
तू चुकतोय; कर्णधार रोहित शर्माच्या ‘या’ निर्णयावर माजी भारतीय क्रिकेटरने मुरडले नाक
VIDEO: एकाच ओव्हरमध्ये जडेजाचे दोन ‘सुपरमॅन कॅच’; दिली सामन्याला कलाटणी