नॉटिंघम। भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळला गेला. या सामन्याच्या ५ व्या आणि अखेरच्या दिवशी पावसामुळे खेळ झाला नाही. त्यामुळे हा सामना अनिर्णित सुटला. असे असले तरी या सामन्यात इंग्लंड कर्णधार जो रुटने शानदार कामगिरी करत सर्वांची वाहवा मिळवली. त्याला या सामन्याचा सामनावीर म्हणूनही घोषित करण्यात आले.
रुटने या सामन्यात पहिल्या डावात ६४ धावांची अर्धशतकी आणि दुसऱ्या डावात १०९ धावांची शतकी खेळी केली. त्यामुळे त्याच्याबाबतीत एक अनोखा योगायोग पाहायला मिळाला आहे. रुटचे हे कसोटी कारकिर्दीतील २१ वे शतक होते.
विशेष म्हणजे रुटने कसोटीत जेव्हाही शतक केले आहे, तेव्हा इंग्लंडने कधीही पराभव स्विकारलेला नाही. त्याने शतक केलेल्या २१ कसोटी सामन्यांपैकी १६ सामने इंग्लंडने जिंकले आहेत. तर ५ सामने अनिर्णित राहिले आहेत. मात्र, एकाही सामन्यात पराभव झालेला नाही.
यावर्षी कसोटीत १००० धावा
रुटने २०२१ या वर्षात कसोटीमध्ये १००० धावाही पूर्ण केल्या आहेत. यावर्षी आत्तापर्यंत अशी कामगिरी करणारा सध्यातरी एकमेव फलंदाज आहे. त्याने यावर्षी ९ कसोटी सामन्यात ५९.११ च्या सरासरीने १०६४ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ४ शतकांचा आणि १ अर्धशतकाचा समावेश आहे. तसेच २२८ ही त्याची यावर्षीची सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे. यावर्षी सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याच्यापाठोपाठ श्रीलंकेचा लहिरु थिरिमन्ने आहे. त्याने ६५९ धावा केल्या आहेत.
दोन्ही संघांना होती विजयाची संधी
ट्रेंट ब्रिजवर झालेल्या इंग्लंड विरुद्ध भारत संघातील पहिल्या कसोटी सामन्यात अखेरच्या दिवशी दोन्ही संघांना विजयाची संधी होती. अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी १५७ धावांची गरज होती, तर इंग्लंडला ९ विकेट्सची गरज होती. मात्र, अखेरच्या दिवशी पावसाने सकाळपासूनच हजेरी लावल्याने सामना अनिर्णित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या –
WTC फायनलमध्ये अपयश येऊनही गोलंदाजीत फारसा बदल नाही, पण ‘या’ गोष्टीत मात्र बदल केला, बुमराहचा खुलासा
‘फॅब फोर’मध्ये असला तरी स्मिथला चार गोलंदाजांचे येते टेंशन, ‘या’ भारतीयाचाही त्यात समावेश