ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक मालिका विजय मिळवल्यानंतर भारतीय संघासमोर मायदेशात इंग्लंड संघाचे आव्हान असणार आहे. 5 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात इंग्लंड संघ बहुचर्चित 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघाला विजयाचा दावेदार मानले जात असले तरी, नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंका दौऱ्यात इंग्लंडने शानदार कामगिरी करत 2-0 ने विजय मिळवला. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये जबरदस्त संघर्ष बघायला मिळणार हे ठरलेले आहे.
मालिकेपूर्वी दोन्ही संघ आपापली रणनीती आखत असणार हे निश्चितच आहे. मात्र अशातच इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्स याची प्रतिक्रिया समोर येत असून त्याच्या मते जसप्रीत बुमराहविरुद्ध रणनीती आखणे अवघड आहे.
बर्न्स म्हणाला, “बुमराह हा एक असा खेळाडू आहे ज्याच्या विरुद्ध रणनीती आखणे अवघड जाते. तो गोलंदाजी करताना इतर गोलंदाजांपेक्षा वेगळा जाणवतो. मी भारत आणि ऑस्ट्रेलियाची मागील मालिका बघितली होती, ज्यात संपूर्ण भारतीय संघ उत्तम फॉर्ममध्ये असल्याचे दिसत होते. भारताची बेस्ट प्लेइंग इलेव्हन नसूनदेखील त्यांनी विजय मिळवला होता. भारतात खेळणे निश्चितच वेगळे असणार आहे व मी या दौऱ्याची वाट बघत आहे.”
विराटसह अनेक प्रमुख खेळाडूंचे पुनरागमन
इंग्लंड संघ भारताच्या दौऱ्यावर 4 कसोटी, 5 टी20 व 3 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 5 फेब्रुवारी पासून चेन्नई येथे होणाऱ्या कसोटी सामन्याने होणार आहे. दोन्ही संघ उत्तम फॉर्ममध्ये असल्याने ही मालिका उत्कंठावर्धक होण्याची सर्व क्रिकेटप्रेमींना अशा असणार आहे.
भारतासाठी या मालिकेत नियमित कर्णधार विराट कोहलीसह अनेक महत्त्वाचे खेळाडू पुनरागमन करणार आहेत. यात इशांत शर्मा, हार्दिक पंड्या यांचा समावेश आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या मालिकेत भारतीय संघ उत्तम कामगिरी करेल अशी सर्वांना आशा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोबाईल आहे ना, मग चिंता नाही! टिव्हीवर नाही पण ‘या’ ऍपद्वारे पाहता येणार भारत-इंग्लंड सामने?
IND Vs ENG: तेंडूलकर, द्रविड यांच्या ‘मोठ्या’ विक्रमावर विराटची नजर; करावी लागतील फक्त २ शतके