इंग्लंड संघाने लॉर्ड्स कसोटी सामना जिंकला असला तरी, दोन दिवसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने संघावर मोठा दंड ठोठावला आहे. इतकेच नाही तर भारताविरुद्ध विजय मिळवूनही, इंग्लंड संघाच्या खात्यातून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे गुणही कापण्यात आले आहेत. आयसीसीने स्लो ओव्हर रेटसाठी इंग्लंडला मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावला आहे. यासोबतच, संघाच्या खात्यातून दोन डब्ल्यूटीसी पॉइंटही कापण्यात आले आहेत, ज्यामुळे त्यांचा विजयाचा टक्का 66.67 पर्यंत घसरला आहे आणि संघ दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.
आयसीसी एलिट पॅनेल मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांनी इंग्लंड संघाला स्लो ओव्हर रेटसाठी दोषी ठरवले आहे. इंग्लंडने दोन षटके उशिरा टाकली, ज्यासाठी आयसीसीने संपूर्ण संघाला शिक्षा केली आहे. आयसीसीच्या खेळाडू आणि खेळाडूंच्या सपोर्ट स्टाफसाठीच्या आचारसंहितेच्या कलम 2.22 नुसार, जे किमान ओव्हर-रेट गुन्ह्यांशी संबंधित आहे, खेळाडूंना निर्धारित वेळेत टाकण्यात अपयशी ठरलेल्या प्रत्येक षटकासाठी त्यांच्या मॅच फीच्या पाच टक्के दंड ठोठावला जातो. निर्धारित वेळेत दोन षटके टाकली नाहीत म्हणून इंग्लंडला 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने प्रस्तावित शिक्षा स्वीकारली आहे. त्यामुळे औपचारिक सुनावणीची आवश्यकता नव्हती. फील्ड पंच पॉल रीफेल आणि शराफुद्दौला इब्ने शाहिद, तिसरे पंच अहसान रझा आणि चौथे पंच ग्रॅहम लॉईड यांनी इंग्लंडविरुद्ध हे आरोप लावले होते. मॅच रेफरीने हे आरोप खरे असल्याचे आढळले आणि इंग्लंडला शिक्षा सुनावण्यात आली. तीन सामन्यांपैकी दुसरा सामना जिंकून इंग्लंडच्या खात्यात 66.67 टक्के विजय गुण होते, परंतु आता ते सुमारे 60 टक्के होतील.






