भारतीय क्रिकेट संघ जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघ येथे न्यूझीलंडविरुद्ध १८ जूनपासून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळेल. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने २० खेळाडूंचा भला मोठा संघ निवडला आहे.
इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या संघातील काही खेळाडू या दौऱ्यामध्ये अपयशी ठरल्यास त्यांची कसोटी कारकीर्द धोक्यात येऊ शकते. आज आपण अशाच तीन खेळाडूंविषयी जाणून घेणार आहोत, जे या दौऱ्यात अपयशी ठरल्यास कदाचित भारतीय कसोटी संघात पुन्हा दिसणार नाहीत.
१) वृद्धिमान साहा –
भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक वृद्धिमान साहा याच्यासाठी हा अखेरचा दौरा ठरू शकतो. एमएस धोनीच्या निवृत्तीनंतर साहाने पाच-सहा वर्ष ही जागा आपली केली होती. मात्र, रिषभ पंत संघात सामील झाल्यापासून या जागेला धोका निर्माण झाला होता. पंतने मागील दोन मालिकांमध्ये जबरदस्त कामगिरी करून दाखवली आहे. अशा परिस्थितीत इंग्लंड दौऱ्यावर साहाला आपला खेळ उंचावता आला नाहीतर संघातून बाहेर जाण्याची नामुष्की येऊ शकते.
२) मयंक अगरवाल –
सलामीवीर मयंक अगरवाल याच्यासाठी देखील हा दौरा स्वतःला सिद्ध करणार ठरू शकतो. घरच्या मैदानांवर उत्कृष्ट कामगिरी करणारा मयंक ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड दौऱ्यात साफ अपयशी ठरला होता. शुबमन गिल चांगली कामगिरी करत असताना मयंकला पुन्हा एकदा संघात स्थान पक्के करण्यासाठी त्याला इंग्लंडमध्ये विशेष खेळ दाखवावा लागेल.
३) उमेश यादव –
ईशांत शर्मानंतर भारताचा सर्वात अनुभवी गोलंदाज असलेला उमेश यादव हा देखील या दौऱ्यात चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असेल. युवा वेगवान गोलंदाज चांगली कामगिरी करत असल्याने उमेशला वारंवार संधी मिळत नाही. इंग्लंड दौऱ्यात संधी मिळाल्यास तो आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल. मोहम्मद सिराज, टी नटराजन व नवदीप सैनी यांसारखे युवा गोलंदाज त्याला संघातील जागेसाठी लढत देत आहेत.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ:
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीलंका दौरा निश्चित असतांना इंग्लंड दौऱ्यासाठी का निवडले हे खेळाडू? बीसीसीआयवर होते आहे टीका
आता बहुधा फक्त भारतीय खेळाडूच खेळणार उर्वरित आयपीएल हंगाम, या कारणामुळे बीसीसीआयच्या अडचणीत वाढ
कसोटी क्रमवारीत भारताने कायम राखले अव्वल स्थान, या संघांची झाली घसरण