लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात 7 बाद 198 धावा केल्या आहेत.
पहिल्या दिवसाखेर जॉस बटलर आणि आदील रशीद अनुक्रमे 11 आणि 4 धावांवर नाबाद खेळत आहेत.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडकडून अलिस्टर कूक आणि केटन जेनिंग्जने चांगली सुरुवात केली होती. या दोघांनी 60 धावांची सलामी भागिदारी रचली होती.
मात्र चांगल्या सुरुवातीनंतरही जेनिंग्जने 23 धावांवर असताना विकेट गमावली. त्याला रविंद्र जडेजाने केएल राहुलकडे झेल देण्यास भाग पाडले.
त्यानंतर कूक आणि तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या मोइन अलीने भारताला सहज विकेट मिळू दिली नाही. कूकने त्याच्या शेवटच्या सामन्यात चांगली कामगिरी करताना अर्धशतक केले. त्याने पहिल्या डावात 190 चेंडूत 8 चौकारांच्या सहाय्याने 71 धावा केल्या.
तसेच कूकला अलीने चांगली साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागिदारी रचली. तसेच हे दोघे फलंदाजी करत असताना कूकचा अजिंक्य रहाणेकडून तर अलीचा कर्णधार विराट कोहलीकडून झेल सुटल्याने त्यांना जीवदान मिळाले होते.
पण नंतर ही जोडी तोडण्यात जसप्रीत बुमराहला यश आले. त्याने कूकला 71 धावांवर असाताना त्रिफळाचीत केले.
बुमराहने कूकला बाद केल्यानंतर दोन चेंडूनंतर लगेचच इंग्लंडचा कर्णधार जो रुटलाही शून्यावर बाद केले. तर त्याच्या पुढच्याच षटकात इशांत शर्माने जॉनी बेअरस्टोला शुन्य धावेवरच माघारी धाडले. बेअरस्टोचा झेल यष्टीरक्षक रिषभ पंतने घेतला.
कूक बाद झाल्यानंतर मात्र इंग्लंडची फलंदाजी कोलमडली. मात्र अलीने एक बाजू सांभळत अर्धशतक केले. त्याने 170 चेंडूत 4 चौकारांसह 50 धावा केल्या. पण दुसऱ्या बाजून नियमित कालांतराने इंग्लंड फलंदाजांच्या विकेट्स जात होत्या.
अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सही या डावात फलंदाजी करताना संघर्ष करत होता. अखेर त्यालाही 11 धावांवर असताना जडेजाने पायचीत बाद केले. तर या मालिकेत उत्तम अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या सॅम करनला या डावात भोपळाही फोडता आला नाही.
भारताकडून इशांत शर्मा(3/28), जसप्रीत बुमराह(2/41) आणि रविंद्र जडेजाने(2/57) विकेट्स घेतल्या आहेत.
तत्पुर्वी सामन्याच्या सुरुवातीला कूक फलंदाजीसाठी आल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंनी दोन्ही बाजूंना उभे राहत कूकला ‘गार्ड आॅफ आॅनर’ दिले होते. कूक या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–एबी डिविलियर्स खेळणार पाकिस्तान सुपर लीगमध्ये!
–का झाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मुलगी सारासाठी भावूक?
–इंडिया ब्ल्यू संघाने जिंकले दुलीप ट्रॉफीचे विजेतेपद