इंग्लंड विरुद्ध भारत संघात सध्या ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेत पहिल्या दोन सामन्यांनंतर भारत १-० अशा फरकाने आघाडीवर आहे. आता तिसरा सामना लीड्समधील हेडिंग्ले स्टेडियम येथे २५ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. मात्र, हा सामना सुरु होण्यापूर्वीच इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड तिसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. खरंतर त्याची तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या १५ जणांच्या संघात निवड झाली होती. मात्र, त्याची उपलब्धता त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून होती. अखेर, तो खांद्याच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसल्याने त्याला तिसऱ्या कसोटीतून माघार घ्यावी लागली आहे.
वूडला भारताविरुद्ध लॉर्ड्समध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी उजव्या खांद्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे वूड जरी तिसऱ्या कसोटीतून बाहेर पडला असला, तरी तो लीड्समध्ये संघासोबतच राहील. त्याच्या दुखापतीवर इंग्लंडचे वैद्यकीय पथक लक्ष ठेऊन आहे.
त्याच्याऐवजी तिसऱ्या कसोटीसाठी साकीब महमूद आणि क्रेग ओव्हरटन यांचे पर्याय इंग्लंड संघाकडे आहेत.
वूडची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
मार्क वूडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत २१ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ६४ विकेट्स घेतल्या असून ४७७ धावा केल्या आहेत. तसेच त्याने ५७ वनडे सामने खेळले असून ६९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर १७ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत त्याने २६ विकेट्स घेतल्या आहेत.
भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघ –
जो रुट (कर्णधार), रॉरी बर्न्स, हसीब हमीद, डेव्हिड मलान, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन, सॅम करन, डॅन लॉरेन्स, साकीब मेहमूद, मोईन अली, क्रेग ओव्हरटन.
महत्त्वाच्या बातम्या –
प्रेक्षकांचे आक्षेपार्ह कृत्य!! चक्क मैदानावर उतरत खेळाडूंवर केला हल्ला, एकजण गंभीर जखमी
शून्य अनुभव असूनही ‘विराटसेना’ करणार लीड्स कसोटी फत्ते! गाळतेय भरपूर घाम
‘हिटमॅन’ रोहित षटकारांच्या विक्रमात दिग्गज कपिल देव यांना पछाडणार, ठोकावा लागणार फक्त…