टॉन्टन। बुधवारी (३० जून) इंग्लंड महिला विरुद्ध भारतीय महिला यांच्यात दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंड संघाने ५ विकेट्ने विजय मिळवत ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. इंग्लंडच्या या विजयामुळे भारताकडून कर्णधार मिताली राजने झळकावलेली अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली. इंग्लंडच्या या विजयात वेगवान गोलंदाज केट क्रॉसने ५ विकेट्स घेत, तर सोफीया डंकलीने अर्धशतक करत मोलाची कामगिरी बजावली.
मधली फळी गडगडत असताना डंकलीचे अर्धशतक
या सामन्यात भारताने इंग्लंडला २२२ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात फारशी बरी झाली नाही. त्यांची सलामीला फलंदाजीसाठी आलेली टॅमी ब्यूमॉन्ट १० धावांवर झुलन गोस्वामीच्या गोलंदाजीचा सामना करताना त्रिफळाचीत झाली. त्यानंतर इंग्लंडची कर्णधार हीदर नाईटने लॉरेन विनफिल्ड हिल हिला साथ द्यायला सुरुवात केली. पण त्यांची जोडी पुनम यादवने फार टिकू दिली नाही. तिने नाईटला केवळ १० धावांवर माघारी धाडले.
त्यानंतर खेळपट्टीवर स्थिरावलेली लॉरेन देखील नतालिया स्कायव्हर बरोबर ३४ धावांच्या भागीदारीनंतर शिखा पांडेच्या जाळ्यात अडकली. तिने ४२ धावांवर यष्टीरक्षक तानिया भाटियाकडे झेल देत आपली विकेट गमावली. त्यापाठोपाठ स्कायव्हर १९ धावा करुन, तर अॅमी एलेन जोन्स २८ धावा करुन बाद झाली. त्यामुळे इंग्लंडची अवस्था ५ बाद १३३ अशी झाल्याने भारतीय महिल्यांच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
मात्र, सहाव्या क्रमांकावर खेळायला आलेल्या सोफिया डंकलीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. तिने फलंदाजीची जबाबदारी घेत कॅथरिन ब्रंटला साथीला घेतले. या दोघींनी ११२ चेंडूत नाबाद ९२ धावांची सहाव्या विकेटसाठी विजयी भागीदारी रचली. त्यामुळे इंग्लंडने ४७.३ षटकात २२५ धावा करत हा सामना सहज जिंकला आणि मालिकेत विजयी आघाडी घेतली. डंकलीने ८१ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ७३ धावा केल्या. तसेच ब्रंटने ४६ चेंडूत ३ चौकारांसह नाबाद ३३ धावा केल्या.
भारताकडून गोलंदाजीत पुनम यादवने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच झुलन गोस्वामी, शिखा पांडे आणि स्नेह राणाने प्रत्येकी १ विकेट घेतली.
केट क्रॉसच्या गोलंदाजीने भारतीय फलंदाजीला लावला सुरुंग
या सामन्यात भारतीय महिलांनी प्रथम फलंदाजी केली. भारताकडून स्म्रीती मंधना आणि शेफाली वर्मा यांनी सलामीला अर्धशतकी भागीदारी करत अश्वासक सुरुवात मिळवून दिली. मात्र, चांगल्या सुरुवातीनंतरही त्यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. स्म्रीती केट क्रॉसच्या गोलंदाजीवर २२ धावांवर त्रिफळाचीत झाली. तर शेफालीला ४४ धावांवर सोफी इक्लेस्टोनच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक अॅमी एलेन जोन्सने त्रिफळाचीत केले. त्यानंतर जेमिमा रोड्रिग्सही ८ धावांवर माघारी परतली.
यानंतर कर्णधार मिताली राजने उपकर्णधार हरमनप्रीत कौरला साथीला घेत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघींच्या जोडीने अर्धशतकी भागीदारी केल्याने भारतील संघ सुस्थितीत आला. मात्र, १०३ चेंडूत ६८ धावांची भागीदारी झाली असतानाच केट क्रॉसच्या गोलंदाजीवर तिलाच झेल देत १९ धावांवर बाद झाली. यानंतर भारतीय फलंदाजी पत्त्याच्या डावासारखी कोसळली.
एका बाजूला विकेट पडत असल्या तरी मितालीने मात्र, दुसरी बाजू सांभाळली होती. पण ती देखील ९२ चेंडूत ६ चौकारांसह ५९ धावांवर असताना धावबाद झाली आणि भारताला तिच्या रुपात ९ वा धक्का बसला. पण ती बाद झाल्यानंतरही झुलन गोस्वामी आणि पुनम यादवने अखेरच्या विकेटसाठी २९ धावांची भागीदारी करत भारताला २२१ धावा अशी सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. गोस्वामी १९ धावांवर नाबाद राहिली तर पुनम डावाच्या शेवटच्या चेंडूवर १० धावांवर असताना इक्लेस्टोनविरुद्ध त्रिफळाचीत झाली.
इंग्लंडकडून केट क्रॉसने १० षटकांत ३३ धावा देत सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तसेच सोफी इक्लेस्टोनने ३ विकेट्स आणि नतालिया स्कायव्हरने १ विकेट घेतली. (England Women won 2nd ODI by 5 wickets against India Women)
मिताली दुखापतग्रस्त
या सामन्यादरम्यान भारतीय महिला संघाला एक जोरधार धक्का बसला. तो म्हणजे, कर्णधार मिताली राजची फलंदाजीनंतर मान दुखावली गेली असल्याने ती क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरली नव्हती. तिच्या ऐवजी भारताच्या क्षेत्ररक्षणावेळी उपकर्णधार हरमनप्रीत कौरने नेतृत्व केले.
पहिल्या सामन्यातही मितालीचे अर्धशतक व्यर्थ
या मालिकेतील पहिल्या सामन्यातही मितालीने ७२ धावांची खेळी केली होती. मात्र, अन्य फलंदाज फार काही खास करु न शकल्याने भारताला प्रथम फलंदाजी करताना २०१ धावाच करता आल्या होत्या. त्यानंतर २०२ धावांचे आव्हान इंग्लंडने टॅमी ब्यूमॉन्ट (८७) आणि नतालिया स्कायव्हर (७४) यांच्या नाबाद अर्धशतकांच्या जोरावर ३५ षटकांत सहज पार केले होते.
भारतासमोर प्रतिष्ठा वाचवण्याचे आव्हान
आता या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना वर्सेस्टरमध्ये ३ जुलैला पार पडणार आहे. या सामन्यात भारतीय संघाला प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान असेल. तर इंग्लंड संघ ३-० ने मालिका जिंकून भारताला व्हाईटवॉश देण्याचा प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या –
‘…तर तुम्ही कोठेही ट्रेनिंग घेऊ शकता’, म्हणत सिनीयर पंड्याने सुरु केला सराव