आयसीसी महिला विश्वचषक २०२२मधील १९ वा सामना रविवारी (२० मार्च) ऑकलंड येथे न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघात पार पडला. हा सामना इंग्लंड महिला संघाने १ विकेटने खिशात घातला. इंग्लंडच्या या विजयाची शिल्पकार नताली सिवर ठरली. विशेष म्हणजे, विश्वचषकातील इंग्लंड संघाचा हा ५ सामन्यांतील दुसरा विजय होता. यासह त्यांनी गुणतालिकेत पाचवे स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, न्यूझीलंड संघाने आतापर्यंत खेळलेल्या ६ सामन्यांमध्ये त्यांना ४ वेळा पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकत इंग्लंड महिला संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, न्यूझीलंड संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ४८.५ षटकात १० विकेट्स गमावत २०३ धावा केल्या आणि इंग्लंडला २०४ धावांचे आव्हान दिले. इंग्लंडनेही या आव्हानाचा तितक्याच ताकदीने सामना केला आणि ४७.२ षटकात ९ विकेट्स गमावत हा आव्हान पूर्ण केले.
YEEEEEEEEEEEEEEEES pic.twitter.com/arwkZbcYP6
— England Cricket (@englandcricket) March 20, 2022
यावेळी इंग्लंड संघाकडून फलंदाजी करताना नताली सिवरने सर्वाधिक धावा केल्या. तिने १०८ चेंडूंचा सामना करताना ६१ धावा केल्या. या धावा करताना तिने ५ चौकारही ठोकले. तिच्याव्यतिरिक्त कर्णधार हीदर नाईटने ४२ धावा, सोफिया डंकली ३३ धावा आणि टॅमी ब्युमाँटने २५ धावांचे योगदान दिले. इतर फलंदाज २० धावसंख्याही पार करू शकले नाहीत.
यावेळी न्यूझीलंड संघाकडून गोलंदाजी करताना फ्रान्सिस मॅकेने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. ९ षटके गोलंदाजी करताना तिने फक्त ३४ धावा दिल्या. मॅकव्यतिरिक्त जेस केरने २, तर ब्रूक हॅलिडे आणि ली ताहुहू यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पूर्वी न्यूझीलंड संघाकडून प्रथम फलंदाजी करताना मॅडी ग्रीनने नाबाद ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली. या धावा करताना तिने १ षटकार आणि ४ चौकारही ठोकले. तसेच, कर्णधार सोफी डिवाइनने दुखापतग्रस्त होऊनही संघासाठी ४१ धावांची खेळी केली. यात ५ चौकारांचा समावेश होता. तिच्याव्यतिरिक्त ऍमी सदरवेट आणि अमेलिया केरने प्रत्येकी २४ धावा केल्या. तसेच, सुझी बेट्सनेही २२ धावांचे योगदान दिले.
यावेळी इंग्लंड संघाकडून गोलंदाजी करताना केट क्रॉस आणि सोफी एक्लेस्टोनने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच, चार्लोट डीनने २ विकेट्स खिशात घातल्या.
महिला विश्वचषक २०२२मधील २०वा सामना सोमवारी (२१ मार्च) पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज संघात खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Womens World Cup 2022: न्यूझीलंड संघाची कर्णधार चालू सामन्यातून बाहेर; कारण घ्या जाणून
हवेत डाईव्ह मारत इंग्लंडच्या कर्णधाराने टिपला शानदार कॅच; फलंदाजालाही बसेना विश्वास; VIDEO VIRAL