सध्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. यानंतर इंग्लंड डिसेंबर-जानेवारी दरम्यान ऍशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. मात्र, यापूर्वीच या मालिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियामधील कठोर निर्बंधांमुळे इंग्लंडचे जवळपास १० खेळाडू या मालिकेतून माघार घेऊ शकतात.
सध्या जगभरात कोरोनाचे सावट पसरले आहे. कोरोनाचा अनेक गोष्टींवर परिणाम झाला आहे. क्रिकेट देखील यातून सुटले नाही. सध्या खेळाडूंना कोणताही सामना किंवा मालिका खेळण्यापूर्वी कोरोना निर्बंधनासाठी घालण्यात आलेल्या नियमांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाने याबाबत खूप कठोर नियम लागू केले आहेत.
टेलिग्राफच्या एका बातमीनुसार, “मागील आठवड्यात झालेल्या एका बैठकीत इंग्लिश खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाच्या कोरोना बाबतच्या या कठोर नियमामुळे नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलिया तिथल्या ऑस्ट्रेलियन सरकारसोबत चर्चा करत होती. मात्र, त्यावर अजूनही कोणता तोडगा निघाल्याचे दिसत नाही. अशात इंग्लंडचे खेळाडू या मालिकेतून माघार घेण्याचा विचार करत आहे.”
“काही दिवसांपूर्वी बांगलादेशचा दौरा संपवून मायदेशात परतलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना देखील सरावासाठी परवानगी दिली गेली नव्हती. त्यांना देखील विलीनीकरणाच्या कठोर नियमांना सामोरे जावे लागले होते. याआधीच सर्व खेळाडू विलीनीकरणाच्या प्रक्रियेला सामोरे जाऊन आले होते. मात्र तरी त्यांना आपल्या खोलीतून बाहेर येण्याची देखील परवानगी नव्हती.”
इंग्लिश खेळाडूंच्या मते परिवारातील सदस्यांमुळे होऊ शकते अडचण
इंग्लंडचे खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी आपल्या परिवाराला सोबत घेऊन जाऊ शकतात. जर एखादा सदस्य नंतर जाऊ इच्छित असेल, तर त्याला सरळ १४ डिसेंबर नंतरच परवानगी मिळेल. मग अशात त्याला ख्रिसमसच्या आदल्या दिवशीपर्यंत विलीनीकरणाच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागेल. अशात खेळाडूंना क्रिसमसच्या दिवसात परिवारासोबत खोलीमध्ये बंद राहायचे नाहीये. अनेक खेळाडू आधीच्याच विलीनीकरणाच्या नियमामुळे कंटाळले आहेत. अशात त्यांना त्यांच्या मुलांना एवढ्या मोठ्या काळासाठी हॉटेलच्या एका खोलीत बंद ठेवायचे नाहीये.
पाकिस्तानचा दौरा होण्यावर देखील आहेत प्रश्नचिन्ह
तसेच इंग्लंडला ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानचा देखील दौरा करायचा आहे. यामध्ये १३ आणि १४ ऑक्टोंबरला २ टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. मात्र, काबूल विमानतळावर झालेल्या हल्ल्यानंतर व अफगानिस्तानवरील तालिबानच्या अधिकारामुळे इंग्लंडचा पाकिस्तान दौरा होण्यावर शंका व्यक्त केली जात आहे.
त्याचबरोबर इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाला देखील दोन टी-२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. या बाबतीत इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डचे (एसीबी) सुरक्षा अधिकारी रेग डिक्सन सुरक्षिततेशी संबंधित पडताळणी करणार आहे. असे असले तरी खेळाडूंनी मात्र चिंता व्यक्त केली आहे. कारण इंग्लंडचा हा २००५ नंतरचा पहिलाच पाकिस्तानचा दौरा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–दुसऱ्यांदा विराटला नडला इंग्लंड संघ; लॉर्ड्सनंतर लीड्समध्ये विद्यमान भारतीय कर्णधाराविरुद्ध केला ‘हा’ पराक्रम
–काय सांगता! भारताला धोबीपछाड देणारा इंग्लंड संघच सर्वाधिकवेळा डावाने पराभूत, भारत ‘या’ क्रमांकावर
–विराटच्या नव्या साथीदाराचा सीपीएलमध्ये पदार्पणातच जलवा, २०० च्या स्ट्राईकरेटने केली अर्धशतकी खेळी