इंग्लंड आणि पाकिस्तान संघांमध्ये मंगळवारी झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यामध्ये इंग्लंडने 3 विकेटने विजय मिळवला. याबरोबर इंग्लंड संघाने पाकिस्तानला व्हाईटवॉश देत ही एकदिवसीय मालिका 3-0 ने आपल्या खिशात घातली. या सामन्यात पाकिस्तान संघाने इंग्लंडला 332 धावांचे लक्ष्य दिले होते. इंग्लंड संघाने हे लक्ष्य 48 षटकांमध्ये 7 विकेट गमावत पूर्ण केले.
इंग्लंड संघाचा खेळाडू जेम्स व्हिन्सने सर्वाधिक 102 धावा केल्या. इंग्लंडच्या विजयाचा हिरो ठरलेला जेम्स विन्सने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याच्या व्यतिरिक्त लुईस ग्रेगरीने 77 धावांचे संघासाठी योगदान दिले. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने देखील सर्वाधिक 158 धावांचा डाव खेळला. परंतु असे असूनही पाकिस्तान संघ इंग्लंड संघाला पराभूत होण्यापासून थांबवू शकला नाही. इंग्लंड संघाच्या जेम्स व्हिन्सला शतकी खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
इंग्लंड आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये झालेल्या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंड नवीन संघ मैदानात उतरवला होता. यामागचे महत्त्वाचे कारण असे की, ही मालिका सुरु होण्याचा केवळ दोन दिवस आधी इंग्लंडच्या मुख्य एकदिवसीय संघातील सात सदस्यांना कोरोनाची लागण झाली. त्यात तीन खेळाडूंचा सामावेश होता. त्यामुळे इंग्लंडच्या मुख्य संघातील सर्वांनाच क्वारंटाईन व्हावे लागले. याच कारणामुळे एका रात्रीत इंग्लंडचा पूर्ण संघ बदलण्यात आला आणि या नव्या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी बेन स्टोक्सच्या खांद्यावर टाकण्यात आली. स्टोक्सनेही चांगले नेतृत्व करत या मालिकेत इंग्लंडला विजय मिळवून दिला आहे.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 50 षटकांत 6 विकेट गमावत 331 धावा केल्या होत्या. या सामन्यात बाबर आझमने आपल्या एकदिवसीय कारकीर्दीतील 14 वे शतक ठोकले. त्याचबरोबर बाबरने सर्वात कमी डावात 14 शतके ठोकण्याचा विश्वविक्रमही त्याने केला. त्याने दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमलाचा विक्रम मोडला. बाबर आझमने 81 एकदिवसीय डावात 14 एकदिवसीय शतकं पूर्ण केली आहेत.
बाबरशिवाय या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात मोहम्मद रिझवानने 58 चेंडूत 74 धावा केल्या. तसेच इमाम-उल-हकने 56 धावांची खेळी केली. तर इंग्लंड संघाकडून ब्रायडन कार्सने 5 गडी बाद केले. त्याने कारकीर्दीत पहिल्यांदाच 5 बळी घेण्याचा विक्रम केला.
त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंड संघाकडून जेम्स व्हिन्सने शतकी खेळी केली. इंग्लंड संघाची अवस्था 24 व्या षटकात 165 धावांत पाच गडी बाद अशी झालेली असताना व्हिन्सने लुईस ग्रेगरीबरोबर 129 धावांची भागीदारी केली आणि इंग्लंडला विजयाच्या समीप नेले. त्यांच्या या भागीदारीमुळे इंग्लंडने केवळ 48 व्या षटकातच 332 धावांचे मोठे आव्हान सहज पार केले.
या सामन्यानंतर इंग्लंड संघाच्या साकीब महमूदला ‘मालिकावीर’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याने या मालिकेत 3 सामन्यांत 9 विकेट्स घेण्याची कामगिरी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
शतक एक विक्रम अनेक! बाबर आझमने १४ वे वनडे शतक झळकावत विराट, अमलासारख्या दिग्गजांना टाकले मागे
भारतीय क्रिकेटच्या ‘दादा’चा बोयपिक येणार भेटीला; ‘हे’ ६ अभिनेते साकारू शकतात गांगुलीची भूमिका
काय सांगता! विश्वचषकातील सुपर ओव्हरपूर्वी बेन स्टोक्स गेला होता सिगारेट प्यायला