क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात क्रांतिकारी घटना काय असेल? असं कोणी विचारलं तर त्याची वेगवेगळी उत्तरे येतील. कोणी वनडे क्रिकेटचं नाव घेईल. कोणी रंगीबिरंगी कपडे तर कोणी टी20 क्रिकेट. मात्र, बारकाईने अभ्यास केला तर एक गोष्ट कळते की, क्रिकेटमधील सर्वात क्रांतिकारी घटना होती कपिल देव यांच्या नेतृत्वातील टीम इंडियाने जिंकलेला 1983 वनडे वर्ल्डकप. या घटनेनंतरच जगभरातील क्रिकेट बदलल. क्रिकेटमध्ये बेसुमार पैसा आला. भारत क्रिकेट जगतावर राज्य करू लागला आणि क्रिकेटला भारतात वेड्यासारखी प्रसिद्धी मिळाली. आजच्या आयपीएलचे मूळ त्यावेळच्या त्या वर्ल्डकप विजयात सापडते. मात्र, त्या वर्ल्डकपनंतर घडलेली एक घटना ही देखील तितक्याच रंजकतेने सांगितली जाते. ती घटना भारतीय संघाशी निगडित होती मात्र त्या घटनेचा नायक भारतीय नव्हता. तो होता एक इंग्लिश पत्रकार डेव्हिड फ्रिथ. नक्की काय होती ती घटना आणि असं कोणतं कृत्य फ्रिथ यांनी केलं ज्यामुळे जगभरात त्यांची वाहवा झाली. त्याच कहाणीवरून आज आपण पडदा हटवणार आहोत.
डेव्हिड फ्रिथ म्हणजे मंथली विस्डेन मंथलीचे संस्थापक. इंग्लंडमधील प्रसिद्ध स्पोर्ट्स मॅक्झिन द क्रिकेटरसाठी काम करत असताना 1978 मध्ये त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकण्यात आले. हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता. मात्र, ते निराश झाले नाही. ते नव्याने उभे राहिले तेही अधिक ताकतीने. विस्डेन मंथली सुरू करत ते वर्षभरात इंग्लंडमधील टॉप स्पोर्ट्स जर्नलिस्ट बनले. सोबतच विस्डेन मंथलीला इंग्लंडच नव्हे, तर जगातील सर्वाधिक विकले जाणारे क्रिकेट मॅक्झिन बनवले. लोकांना जे आवडते तेच लिहून त्यांनी हा पल्ला गाठलेला. 42 व्या वर्षीच ते इथपर्यंत पोहोचले.
पुढच्या चार वर्षात म्हणजे 1983 वर्ल्डकपपर्यंत या दोन्ही मॅक्झिमनमध्ये सेलचे तुंबळ युद्ध सुरू होते. जून 1983 मध्ये वर्ल्ड कप होणार होता. वर्ल्डकपचा हवा तयार करायला विस्डेन मंथलीने आपलं प्री वर्ल्डकप एडीशन छापलं. स्वतः फ्रिथ यांनी लिहिलेल्या आर्टिकलमध्ये ते टीम इंडियाच्या विरोधात अनेक गोष्टी बोललेले. त्यांनी लिहिलेलं,
“टीम इंडिया वनडे खेळण्याच्या पात्रतेची नाही. त्यांनी आपली वर्ल्डकपची जागा दुसऱ्या एखाद्या टीमला द्यावी. नाहीतर सरळ स्पर्धेतून नाव मागे घ्यावे. ते वनडे क्रिकेट खेळण्यासाठी इच्छुक नसले तर त्यांनी पुढच्या वर्ल्ड कपपासून वर्ल्डकपसाठी येऊच नये. यावेळी टीम इंडियाने ग्रुप स्टेज जरी पार केली, तरी मी माझे शब्द खाईल.”
थोडक्यात मी माझी चूक झाली, हे मान्य करेल असे त्यांनी म्हटले.
फ्रिथ यांचे हे शब्द खूप मोठे होते. मात्र, ते जे बोललेले ते आकडेवारीवरून खरं दिसत होतं. कारण, टीम इंडियने तोपर्यंत खेळलेल्या 40 वनडेपैकी 28 वनडे हरलेल्या. मागच्या दोन वर्ल्डकपमधील फक्त एक मॅच ते जिंकू शकलेले. इतकच काय मागील वर्ल्डकपमध्ये असोसिएट नेशन असलेल्या श्रीलंकेने त्यांना हरवलेले. त्यामुळेच फ्रिथ इतक्या टोकाचे शब्द बोललेले.
ही गोष्ट भारतातही पोहोचलेली. अनेकांना याचा राग आलेला. मात्र, एकच व्यक्ती हा विश्वास बाळगून होता की आपण यावेळी जिंकू. तो व्यक्ती होता कॅप्टन कपिल देव. अगदी बीसीसीआयलाही आपली टीम पहिल्या ग्रुपमधून पुढे जाणार नाही असे वाटलेले. मात्र, टीमने आपलं कर्तृत्व आणि कपिलच्या नेतृत्वावर वर्ल्डकप विजयाच्या दिशेने आगेकूच सुरू ठेवली.
शेवटी 25 जून 1983 ऐतिहासिक दिवस उजाडला. दोन वेळच्या चॅम्पियन वेस्ट इंडीजला हरवत टीम इंडियाने कोणाच्याही ध्यानीमही नसताना वर्ल्डकप जिंकला. त्यादिवशीच्या प्रेस बॉक्समध्ये डेव्हिड फ्रिथ हे देखील उपस्थित होते. त्यांनी जे शब्द लिहिलेले ते खोटे ठरलेले. त्यावर उडवाउडवीची उत्तरे देण्यापेक्षा ते मनापासून त्या प्रेस बॉक्समधून टीम इंडियासाठी टाळ्या वाजवत होते. इतकेच करून ते थांबले नाहीत. टीम इंडियापाठोपाठ ते हॉटेलमध्ये पोहोचले आणि तिथल्या लॉबीत कपिल देव यांच्यासोबत त्यांनी भांगडा केला.
ज्या फ्रिथ यांच्यावर भारतीय खेळाडूंचा राग होता, त्याच फ्रिथ यांच्या लॉर्ड्सवरील कार्यक्रमासाठी सर्व खेळाडूंनी स्वाक्षऱ्या केलेल्या. विश्वविजयाची ती रात्र फ्रिथ यांनी टीम इंडियासोबत एन्जॉय केली. त्यानंतर त्यांना जगभरातून पत्रे आली ज्यामध्ये ते कसे खोटे ठरले हे सांगण्यात आलेलं. त्यातील एक पत्र होते न्यू जर्सी येथील मानसिंग या व्यक्तीचे. मानसिंग यांनी लिहिलेले,
“सर डेविड फ्रिथ तुम्ही खोटे ठरलात. तुम्हाला तुमचे शब्द खावे लागतील. मी त्या आर्टिकलचे तुकडे पाठवतोय. ते कॉफी किंवा अन्य कोणत्याही पदार्थासोबत तुम्ही खाऊ शकता.”
जगातील सर्वात मोठ्या मॅक्झिनचे संस्थापक असलेल्या फ्रिथ यांना ही गोष्ट इग्नोर करता आली असती. मात्र, त्यांनी लॉर्ड्सच्याच प्रेस बॉक्समध्ये बसून ते तुकडे खाल्ले. स्वतःच्याच मॅक्झिनमध्ये त्याचा फोटोही छापून आणला. खाली लिहिले,
“पाहा मी माझे शब्द खाल्ले.”
त्यांच्या या कृत्याने त्यांची जगभरातील प्रतिमा आणखीनच उंचावली आणि भारतातही नवे फॅन्स तयार झाले. अगदी शब्द खायला लावणारा मानसिंगही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
खेळाडूंनी 7 जन्म घेतले, तरीही क्रिकेट जगतातील ‘हे’ विक्रम तुटणे केवळ अशक्यच; तुम्हीही घ्या जाणून
जेव्हा क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा खेळलेल्या 2 टीम इंडिया, जाणून घ्या काय लागलेला निकाल






