इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात गेल्या काही दिवसांपासून ५ सामन्यांची कसोटी मालिका चालू आहे. आतापर्यंत या मालिकेतील २ सामने पार असून पाहुणा भारतीय संघ १-० ने आघाडीवर आहे. दुसरीकडे बॅकफूटवर असलेल्या यजमान इंग्लंड संघाला दुखापतींच्या ग्रहणाने ग्रासले आहे. एकामागोमाग एक त्यांचे बरेचसे प्रमुख खेळाडू दुखापतींमुळे सामन्यांना मुकत आहेत. अशात आगामी तिसऱ्या सामन्यापूर्वी वेगवान गोलंदाज मार्क वुडच्या रुपात इंग्लंडला अजून एक धक्का बसला आहे.
त्यामुळे त्याच्याजागी इंग्लंडच्या ताफ्यात नवा वेगवान गोलंदाज, साकिब महमूद खेळताना दिसू शकतो. २५ ऑगस्टपासून हेडिंग्ले स्टेडियम, लीड्स येथे तिसरा कसोटी सामना रंगणार आहे.
लॉर्ड्स येथे दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करतेवेळी वुडच्या खांद्याला दुखापत झाली होती. तो अद्यापही या दुखापतीतून सावरला नसल्याने तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी अनुपलब्ध असणार आहे. त्यामुळे २४ वर्षीय महमूदला तिसऱ्या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळणार आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटनेही याबाबतीत संकेत दिले आहेत.
परंतु सर्वांना अपरिचित असलेला हा गोलंदाज नक्की आहे तरी कोण?, रूटने त्याच्यावरच इतका विश्वास का दाखवला असावा? असे बरेचसे प्रश्न अनेकांच्या डोक्यात घोंगावत असतील. चला तर याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया…
कोण आहे साकिब महमूद?
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज महमूद याचा जन्म बर्मिंघम शहरातला. २५ फेब्रुवारी १९९७ मध्ये जन्मलेल्या महमूदचे आई-वडील हे मुळचे पाकिस्तान देशातील राहणारे होते. क्रिकेटची प्रचंड आवड असलेला महमूद २०१९ साली व्हिजाच्या समस्यांमुळे चर्चेत आला होता. त्यावेळी इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार होता. मात्र भारताचा व्हिजा न मिळाल्यामुळे त्याला ते शक्य झाले नाही. याचवर्षी महमूदने मायदेशात प्रतिष्ठित वनडे स्पर्धा, रॉयल लंडन चषकात लँकशायर संघाकडून खेळताना अप्रतिम कामगिरी केली.
तो लँकशायर क्लब आणि अ दर्जाच्या क्रिकेट सामन्यात ५ विकेट्स घेणारा (5 Wicket haul) पहिलाच गोलंदाज ठरला होता. त्याच्या याच कामगिरीमुळे २०१९ मध्ये त्याला न्यूझीलंडविरुद्ध टी२० पदार्पणाची संधी मिळाली. त्यानंतर २०२० मध्ये त्याचे वनडे पदार्पणही झाले होते. आता भारताविरुद्ध कसोटीत पदार्पण करत तो इंग्लंडकडून क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात आपले नाव चमकवेल.
हेडिंग्ले कसोटीसाठी का केली महमूदची निवड?
दुखापतग्रस्त मार्क वुडच्या जागी महमूदला निवडण्यामागचे कारण म्हणजे, त्याची हेडिंग्ले मैदानावरील कामगिरी असावी. कारण २ वर्षांपूर्वी लँकशायर संघाकडून साकिबने हेडिंग्लेमध्येच आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवली होती. याच सामन्यात त्याने ५ फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. त्यामुळे भारतीय संघातील फलंदाजांना जेम्स अँडरसन, ऑली रॉबिन्सन यांच्यासह साकिब महमदूच्याही गोलंदाजीविरुद्ध सांभाळून खेळावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
स्वत: द्रविडचीच भारतीय संघाचा प्रशिक्षक बनण्यास अनिच्छा, बीसीसीआय अधिकाऱ्याने दिले संकेत
भारतीय संघाचं माहीत नाही, पण आम्ही पूर्णपणे खेळावर लक्ष केंद्रित करणार आहोत- जो रूट
विराटसेना अजून बळकट! दुखापतीवर मात करत ‘या’ खेळाडूचे पुनरागमन, रहाणेने दिली माहिती