मुंबई । इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात साऊथॅम्प्टन येथे तिसरा आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामना होणार आहे. खराब हवामानामुळे 30 मिनिटे आधीच खेळ सुरू होणार आहे. याची घोषणा सामना सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर गुरुवारी करण्यात आली. हा सामना भारतीय वेळेनुसार तीन वाजता सुरू होईल. पाऊस आणि खराब प्रकाशामुळे मालिकेतला दुसरा कसोटी सामना अनिर्णित झाला.
या बदलावर दोन्ही संघांचे कर्णधार आणि प्रशिक्षक सहमत आहेत. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे की, “इंग्लंडमधील भविष्यातील मालिकेदरम्यान अशा प्रकारच्या बदलांचा समावेश केला जाईल. खराब हवामानामुळे वाया गेलेल्या वेळेची भरपाई करण्यासाठी या प्रकारच्या नियमामुळे मदत होईल.”
इंग्लंडच्या संघाने पहिली कसोटी तीन विकेट्सने जिंकून तीन सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती, तर दुसरी कसोटी पाऊस आणि खराब प्रकाशामुळे अनिर्णीत झाली होती. इंग्लंडचा फलंदाज ओली पोप म्हणाला, “हा तिसरा कसोटी सामना आमच्यासाठी या वर्षातील अखेरची कसोटी असू शकेल. गेल्या आठवड्यात निराशा झाल्यावर ओल्ड ट्रॅफर्डचा विजय आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे.”
तो म्हणाला, “दुसर्या कसोटी सामन्यादरम्यान दोन्ही संघांसाठी खराब प्रकाश ही मोठी समस्या होती. खराब प्रकाशात ड्यूक बॉलविरुद्ध फलंदाजी करणे आव्हानात्मक आहे असे मला वाटत नाही.”
इंग्लंडचा संघ आपल्या मायदेशात आणखी एक मालिका जिंकू इच्छित आहे, तर पाकिस्तान संघाने 2010 पासून इंग्लंडमध्ये मालिका गमावली नाही. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत इंग्लंड सध्या तिसर्या क्रमांकावर आहे तर पाकिस्तान153 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
गेल्या 10 वर्षांत दोन संघांदरम्यान चार कसोटी मालिका खेळल्या गेल्या, ज्यामध्ये पाकिस्तान अजिंक्य राहिला. तत्पूर्वी, इंग्लंडच्या संघाने जुलै 2010 मध्ये मायदेशात पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिका 3-1 ने जिंकली होती. त्यानंतर, दहा वर्षात या दोघांमध्ये चार कसोटी मालिका खेळल्या गेल्या आहेत. त्यापैकी पाकिस्तानने 2012 आणि 2015 मध्ये दोन मालिका जिंकल्या, त्या यूएईमध्ये झाल्या होत्या. 2016 आणि 2018 मध्ये इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या दोन कसोटी मालिका बरोबरीत सुटल्या.
गेल्या 6 वर्षांपासून घराच्या मैदानावर इंग्लंड संघाचा विक्रम शानदार आहे. त्यांनी कसोटी मालिका गमावली नाही. यावेळी संघाने 12 पैकी 8 द्विपक्षीय मालिका जिंकल्या. तर 4 मालिका अनिर्णीत राखल्या. गेल्या महिन्यात जुलैमध्ये इंग्लंडने घरच्या मालिकेत वेस्ट इंडिजचा 2-1 असा पराभव केला होता. यापूर्वी जून 2010 मध्ये श्रीलंका संघाने इंग्लंडच्या संघाचा 1-0 ने पराभव केला होता.
पाकिस्तानविरुद्ध इंग्लंडने 85 पैकी 26 कसोटी सामने जिंकले आहेत. तर त्यांनी 21 गमावले, तर 38 सामने अनिर्णित राहिले. त्याचबरोबर घरच्या मैदानावर इंग्लिश संघाने 55 पैकी 24 कसोटींमध्ये पाकिस्तानला पराभूत केले आहे. इंग्लंडचा 12 सामन्यांत पराभव झाला, तर 19 कसोटी सामने अनिर्णीत राखले.
दोन्ही संघ
इंग्लंडः जो रूट (कर्णधार), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, डोमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बार्न्स, जोस बटलर, जॅक क्रोली, सॅम कुर्रान, ऑली पोप, डोम सिब्ली, ख्रिस वॉक्स, मार्क वुड, जेम्स ब्रेसी, बेन फॉक्स, जॅक लीच.
पाकिस्तानः अझर अली (कर्णधार), बाबर आजम, आबिद अली, आशद शफीक, फहीम अशरफ, फवाद आलम, इमाम उल हक, इम्रान खान, काशिफ भट्टी, महंमद अब्बास, मुहम्मद रिझवान, नसीम शाह, सरफराज अहमद, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, सोहेल खान, उस्मान शिनवारी, वहाब रियाज, यासिर शाह.






