---Advertisement---

4th Test Live: शार्दुलचे ताबडतोड अर्धशतक, तर विराटच्या संयमी ५० धावा; भारताचा पहिला डाव १९१ धावांवर संपुष्टात

On: गुरूवार, सप्टेंबर 2, 2021 11:14 PM
---Advertisement---

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात गुरुवारपासून (२ सप्टेंबर) ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना केनिंग्टन ओव्हल मैदानात सुरु झाला आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर इंग्लंडने १७ षटकांत ३ बाद ५३ धावा केल्या आहेत.

भारताला १९१ धावांवर रोखल्यानंतर इंग्लंडकडून रॉरी बर्न्स आणि हसीब हमीद ही जोडी सलामीला फलंदाजीसाठी उतरली. मात्र, या दोघांनाही चौथ्या षटकांत बाद करत जसप्रीत बुमराहने इंग्लंडला जबरदस्त धक्के दिले. बर्न्स ५ धावांवर आणि हमीद शुन्यावर बाद झाला.

त्यानंतर मात्र, इंग्लंडचा कर्णधार जो रुटने डेव्हिड मलानसह डाव सावरला होता. पण, डावाच्या १६ व्या षटकात उमेश यादवने अप्रतिम चेंडू टाकत जो रुटला त्रिफळाचीत केले. रुट २५ चेंडूत २१ धावा करुन बाद झाला. त्याच्यानंतर क्रेग ओव्हरटन फलंदाजीसाठी आला. त्याने मलानसह फलंदाजी करताना दिवसाखेरपर्यंत आणखी पडझड होऊ दिली नाही. मात्र, भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला डावाच्या सुरुवातीलाच मोठे धक्के दिल्याने दिवसाचा शेवट गोड केला.

भारतीय संघाचा पहिला डाव १९१ धावांवर संपुष्टात

या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारताचा पहिला डाव ६१.३ षटकातच १९१ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून शार्दुल ठाकूरने आक्रमक फलंदाजी करताना सर्वाधिक ५७ धावा केल्या. तसेच कर्णधार विराट कोहलीने ५० धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त एकाही भारतीय खेळाडूला २० धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही.

इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर ऑली रॉबिन्सनने ३ विकेट्स घेतल्या. तसेच जेम्स अँडरसन आणि क्रेग ओव्हरटनने प्रत्येकी १ विकेट घेतली.

शार्दुलचे तुफानी अर्धशतक

त्यामुळे पाहुणा भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. दुसऱ्या सत्राखेरपर्यंत ६ विकेट्स गमावल्यानंतर तिसऱ्या सत्रात शार्दुल ठाकूरकडून मात्र, ताबडतोड फलंदाजी पाहायला मिळाली. तिसऱ्या सत्राची सुरुवात रिषभ पंत आणि शार्दुल ठाकूरने केली होती. पण पंत ५३ व्या षटकात ९ धावांवर असताना ख्रिस वोक्सविरुद्ध खेळताना मोईन अलीकडे झेल देत बाद झाला.

मात्र, त्यानंतर शार्दुलने भारताच्या फलंदाजीची जबाबदारी घेत ताबडतोड फलंदाजी केली. त्याने चौकार षटकारांची बरसात करत ३१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, अर्धशतक पूर्ण करताच तो ६१ व्या षटकांत ५७ धावांवर बाद झाला. त्याने ३६ चेंडूंच्या या खेळीत ७ चौकार आणि ३ षटकार ठोकले. त्याच्यापाठोपाठ ६१ व्या षटकात ऑली रॉबिन्सनने उमेश यादवला १० धावांवर बाद केले, तर जसप्रीत बुमराह धावबाद झाला. त्यामुळे भारताचा डाव १९१ धावांवर संपुष्टात आला.

विराट अर्धशतकानंतर बाद

पहिल्या सत्रात ३ विकेट्स गमवालेल्या भारतीय संघाकडून दुसऱ्या सत्रात विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी सावध सुरुवात केली होती. पण, ३० व्या षटकात रविंद्र जडेजाला १० धावांवर ख्रिस वोक्सने बाद करत भारताला मोठा धक्का दिला.

यानंतर विराटला साथ देण्यासाठी उपकर्णधार अजिंक्य रहाणे मैदानात आला. तो १ धावेवर असताना वोक्सने पायचीतसाठी अपील केले, ज्यावर मैदानावरील पंचांनी त्याला बाद घोषित केले होते. मात्र, रहाणेने डीआरएस रिव्ह्यूचा वापर केला. ज्यात तो नाबाद असल्याचे दिसले. त्यामुळे मैदानावरील पंचांना आपला निर्णय बदलावा लागला.

त्यानंतर रहाणेने संयमी खेळ करताना विराटला साथ देण्यास सुरुवात केली. ४० व्या षटकादरम्यान विराटने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ८५ चेंडूत त्याचे अर्धशतक केले. याबरोबरच भारताच्या १०० धावाही पूर्ण झाल्या. पण, विराट त्याच्या अर्धशतकाचे रुपांतर मोठ्या खेळीत करु शकला नाही. त्याला ऑली रॉबिन्सनने ४३ व्या षटकात यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोकडे झेल देण्यास भाग पाडले. विराटने ९६ चेंडूत ५० धावा केल्या.

विराटनंतर काहीवेळात रहाणेनेही आपली विकेट गमावली. त्याला ५० व्या षटकात क्रेग ओव्हरटनने मोईन अली करवी झेलबाद केले. रहाणे ४७ चेंडूत १४ धावा करुन बाद झाला. आता भारताच्या फलंदाजीची जबाबदारी रिषभ पंत आणि शार्दुल ठाकूरवर आहे.

भारताने दुसऱ्या सत्राखेरपर्यंत ५१ षटकांत ६ बाद १२२ धावा केल्या आहेत. पंत आणि शार्दुल प्रत्येकी ४ धावांवर खेळत आहेत.

पहिल्या सत्रात इंग्लंडचे वर्चस्व

भारताकडून केएल राहुल आणि रोहित शर्मा या दोघांनी डावाची सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीला सावध खेळ केला. मात्र, डावाच्या ९ व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर ख्रिस वोक्सविरुद्ध खेळताना रोहित बाद झाला. रोहितचा ११ धावांवर यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोने झेल घेतला.

त्यानंतर केएल राहुलला साथ देण्यासाठी चेतेश्वर पुजारा मैदानात उतरला. मात्र, या दोघांची जोडी फार काळ टिकू शकली नाही. राहुलला १४ व्या षटकात ऑली रॉबिन्सनने पायचीत केले. राहुलने डीआरएसचा वापर केला होता. मात्र, तिसऱ्या पंचांनी ‘अंपायर्स कॉल’ असा निकाल दिल्याने मैदानावरील पंचांनी दिलेला बादचा निर्णयच अंतिम मानण्यात आला. त्यामुळे राहुलने १७ धावांवर विकेट गमावली.

त्यानंतर पुजाराही २० व्या षटकात जेम्स अँडरसनविरुद्ध खेळताना यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोकडे झेल देऊन ३१ चेंडूत ४ धावा करुन बाद झाला. यानंतर अखेर पहिले सत्र संपेपर्यंत विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही.

या डावात जडेजाला ५ व्या क्रमांकावर बढती मिळाली आहे. तसेच विराटने या डावादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. तो २३ हजार धावा करणारा सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडनंतरचा तिसराच भारतीय, तर जगातील सातवा फलंदाज ठरला आहे.

पहिले सत्र संपले तेव्हा भारताने २५ षटकात ३ बाद ५४ धावा केल्या होत्या. विराट १८ धावांवर आणि जडेजा २ धावांवर नाबाद आहे.

हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे, कारण हा सामना जो संघ जिंकेल तो या मालिकेतील आपला पराभव देखील टाळेल. या मालिकेत पहिल्या ३ सामन्यांनंतर १-१ अशी बरोबरी झालेली आहे.

असे आहेत ११ जणांचे संघ – 
ओव्हल कसोटीसाठी भारतीय संघाने अंतिम ११ जणांच्या संघात २ महत्त्वाचे बदल केले आहेत. मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांना छोट्या दुखापती असल्याने त्यांना या सामन्यासाठी संधी देण्यात आली नाही. त्यामुळे अंतिम ११ जणांच्या भारतीय संघात इशांत आणि शमी ऐवजी उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर यांची निवड झाली आहे.

त्याचबरोबर मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या अनुभवी फिरकीपटू आर अश्विनला चौथ्या सामन्यासाठीही अंतिम ११ मध्ये संधी देण्यात आली नाही. भारताने फिरकी गोलंदाजीसाठी चौथ्या सामन्यासाठीही रविंद्र जडेजावरच विश्वास ठेवला आहे.

चौथ्या सामन्यासाठी इंग्लंड संघाने देखील अंतिम ११ जणांच्या संघात २ बदल केले आहेत. उर्वरित कसोटी मालिकेतून पालकत्व रजा घेऊन माघार घेतलेल्या जोस बटलर ऐवजी ऑली पोपला इंग्लंडच्या ११ जणांच्या संघात संधी देण्यात आली आहे. तर सॅम करनला वगळून ख्रिस वोक्सला अंतिम ११ जणांच्या संघात निवडण्यात आले आहे. त्यामुळे वोक्स दुखापतीनंतर पुनरागमन करताना दिसले.

चौथ्या सामन्यासाठी दोन्ही संघ – 
भारत – रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

इंग्लंड – रॉरी बर्न्स, हसीब हमीद, डेव्हिड मलान, जो रूट (कर्णधार), ऑली पोप, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), मोईन अली, ख्रिस वोक्स, क्रेग ओव्हरटन, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---