इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यात भारतीय संघ सध्या २-१ ने आघाडीवर आहे. ओव्हलच्या मैदानातील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत इंग्लंडवर १५७ धावांनी विजय मिळवला होता. सामन्याच्या शेवटच्या आणि निर्णायक दिवशी भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने गोलंदाजीचे उत्कृष्ट प्रदर्शन करत इंग्लंडच्या मधल्या फळीतील फलंदाजांना बाद केले होते.
बुमराहने त्याच्या यॉर्कर चेंडूवर ओली पोप आणि जॉनी बेयरस्टो यांच्या महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या होत्या. तसेच बुमराह या मालिकेत भारताकडून सर्वात जास्त गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. या मालिकेनंतर बुमराहला आयपीएल आणि टी-२० विश्वचषक स्पर्धेत देखील खेळायचे आहे.
त्यामुळे बुमराहवरील कामाचा भार पाहता भारतीय संघ ५ व्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात बुमराहला आराम देण्याचा निर्णय घेऊ शकतो. मात्र, भारतीय संघाने २००७ नंतर इंग्लंडमध्ये एकदाही कसोटी मालिका जिंकलेली नाही. अशात बुमराह भारतीय संघाचा महत्त्वाचा गोलंदाज आहे.
या मालिकेत बुमराहने आतापर्यंत १५१ षटकांची गोलंदाजी केली आहे. यादरम्यान बुमराहने २१ च्या सरासरीने १८ विकेट्स देखील घेतले आहे. अशात जर बुमराहला शेवटच्या कसोटी सामन्यात आराम दिला, तर बुमराह ऐवजी मोहम्मद शमीला संघात स्थान दिले जाऊ शकते. शमीने देखील या मालिकेत उत्कृष्ट प्रदर्शन करत ३ सामन्यांमध्ये ११ विकेट्स घेतले आहेत.
रविचंद्रन अश्विनला देखील मिळू शकते संधी
भारताचा अनुभवी फिरकीपटू गोलंदाज आर अश्विनला देखील इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत एकही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याच्या ऐवजी भारतीय संघाने रवींद्र जडेजाला संधी दिली होती. मात्र, जडेजा या मालिकेत काही खास करू शकला नाही. त्याने ४ सामन्यांमध्ये ४५ च्या सरासरीने केवळ ६ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच फलंदाजीतही त्याची चमक दिसली नाही, त्याने २३ च्या सरासरीने केवळ १६० धावा केल्या आहेत.
तर, पुढच्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने फिरकीपटू गोलंदाज जॅक लीचला संघात स्थान दिले आहे. अशात भारतीय संघ देखील कसोटी क्रिकेटमध्ये ४०० पेक्षा जास्त विकेट्स घेणाऱ्या आर अश्विनला संघात सामील करू शकतो.
रहाणेच्या खेळण्यावर आहेत प्रश्नचिन्ह
भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत आहे. त्याचा हा खराब फॉर्म इंग्लंड दौऱ्यात देखील तसाच चालू आहे. आतापर्यंत खेळलेल्या ४ कसोटी सामन्यांमध्ये रहाणेने १६ च्या सरासरीने केवळ १०९ धावा केल्या आहेत. त्यामुळे रहाणेच्या निवडीबाबत अनेक वेळा प्रश्नचिन्ह देखील उपस्थित करण्यात आले होते.
असे असले तरी भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी रहाणेचा खराब फॉर्म सध्या चिंतेचा विषय नसल्याचे सांगितले होते. मात्र तरीही भारतीय संघ शेवटच्या कसोटी सामन्यात रहाणेऐवजी सुर्यकुमार यादवला संधी देऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
–‘स्वप्न पूर्ण होतात!’ टी२० विश्वचषकासाठी निवड झाल्यानंतर सूर्यकुमारची भावूक पोस्ट
–श्रेयस अय्यरला राखीव खेळांडूमध्ये ठेवून ईशान किशनला मुख्य संघात संधी देण्यामागे ‘हे’ आहे कारण
–शेवटचा कसोटी सामना होणार की नाही? गांगुली म्हणाला, ‘आम्हाला माहित नाही…”