---Advertisement---

CSKvsKKR: जडेजाच्या धुव्वादार खेळीने केकेआरच्या तोंडून हिसकावला सामना, सीएसकेचा २ विकेट्सने विजय

---Advertisement---

रविवार रोजी (२७ सप्टेंबर) इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा दुसरा डबल हेडर रंगला आहे. यातील पहिली लढत अर्थातच हंगामातील ३८वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर पार पडला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाताच्या संघाने २० षटकात ७ विकेट्स गमावत १७१ धावा केल्या. चेन्नईच्या संघाने ८ विकेट्स गमावत त्यांचे हे आव्हान पूर्ण केले आणि २ विकेट्सने सामना जिंकला.

कोलकाताच्या १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या सलामीवीरांनी ७४ धावांची भक्कम सलामी भागिदारी दिली. आंद्रे रसेलने इयॉन मॉर्गनच्या हातून ऋतुराजला झेलबाद करत त्यांची ही भागिदारी मोडली. ऋतुराज ४० धावांवर बाद झाला. त्यानंतर ४३ धावांवर खेळत असलेल्या फाफला प्रसिद्ध कृष्णाने पव्हेलियनचा रस्ता दाखवला. या २ फलंदाजांव्यतिरिक्त चेन्नईच्या इतर फलंदाजांना विशेष कामगिरी करता आली नाही.

मात्र आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर अष्टपैलू रविंद्र जडेजाने शेवटच्या षटकात धुव्वादार फटकेबाजी केली. त्याने अवघ्या ८ चेंडूंमध्ये २२ धावा कुटत संघाला थरारक विजय मिळवून दिला.

कोलकाताकडून सुनिल नरेनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर प्रसिद्ध कृष्णा, लॉकी फर्ग्युसन, आंद्रे रसेल आणि वरुण चक्रवर्ती यांनीही प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.

तत्पूर्वी या सामन्याच्या सुरुवातीलाच पहिल्या षटकात कोलकाताला सलामीवीर शुबमन गिलच्या रुपात पहिला धक्का बसला. डीआरएसमुळे जीवनदान मिळाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर तो दुर्देवीरित्या धावबाद झाला. त्यानंतर वेंकटेश अय्यरही १८ धावांवर शार्दुल ठाकूरची शिकार बनला. त्याच्यानंतर काही अंतराने कर्णधार इयॉन मॉर्गनही (८ धावा) स्वस्तात बाद झाला.

पुढे अष्टपैलू रविंद्र जडेदाने राहुल त्रिपाठीच्या रुपात संघाला मोठे यश मिळवून दिले. ४५ धावांवर खेळत असलेला त्रिपाठी १२.२ षटकात त्रिफळाचीत झाला. त्याच्यानंतर नितिश राणाने डावाखेर नाबाद ३७ धावांची चिवट झुंज दिली. दरम्यान आंद्रे रसेल (२० धावा) आणि दिनेश कार्तिक (२६ धावा) यांनीही काही धावा जोडल्या.

चेन्नईकडून शार्दुल ठाकूर आणि जोश हेजलवुड यांनी सर्वाधिक २ विकेट्स चटकावल्या. तसेच रविंद्र जडेजालाही एका विकेटचे यश आले.

ड्वेन ब्रावोला विश्रांती

या सामन्यासाठी कोलकाताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कसलाही बदल करण्यात आलेला नाही. तर कर्णधार एमएस धोनी चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये १ महत्त्वपूर्ण बदल केला आहे. त्याने मागच्या सामन्याचा मॅच विनर अष्टपैलू ड्वेन ब्रावो याला विश्रांती दिली आहे. त्याच्याजागी सॅम करनला संधी देण्यात आली आहे.

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, मोईन अली, अंबाती रायडू, सुरेश रैना, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, सॅम करन, शार्दुल ठाकूर, दिपक चाहर, जोश हेजलवूड

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल, वेंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, इऑन मॉर्गन (कर्णधार), नितीश राणा, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, सुनील नारायण, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती, प्रसिद्ध कृष्णा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---