---Advertisement---

उपांत्य सामन्यात पराभूत झाल्यानंतर आली मॉर्गनची प्रतिक्रिया; म्हणाला…

---Advertisement---

यूएई आणि ओमानमध्ये सुरू असलेल्या आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली. परंतु शेवटी न्यूझीलंड संघाने बाजी मारली आणि आयसीसी टी २० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात पराभूत झाल्यानंतर इंग्लंड संघाचा कर्णधार ओएन मॉर्गन याने मोठी प्रतिक्रीया दिली आहे.

सामना झाल्यानंतर मॉर्गनने म्हटले की, “सामन्यात आल्यावर आम्हाला माहित होते की दोन्ही संघ कौशल्याच्या बाबतीत अगदी सारखे आहेत. संपूर्ण श्रेय केन आणि त्याच्या संघाला जाते. मला माझ्या सर्व खेळाडूंचा खूप अभिमान आहे. त्यांनी संपूर्ण स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. आमची चूक कुठे झाली हे सांगणं आता कठीण आहे. खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळत होती. तसेच चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवणे थोडे कठीण होते. आम्ही मोठी धावसंख्या उभारली होती. परंतु ते आमच्यापेक्षा चांगले खेळले.”

तसेच सामना झाल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने म्हटले की, “आम्ही अनेकदा आमनेसामने आलो आहे. त्यामुळे आम्हाला माहीत होते की, हा सामना रोमांचक होणार आहे आणि खरचं आमच्या संघाने चांगली कामगिरी केली. वरच्या फळीत मिचेलने चांगली फलंदाजी केली. टी२० क्रिकेटमध्ये खेळपट्टी, मैदानावरील सर्वात छोट्या छोट्या गोष्टी महत्वाच्या ठरतात. आमच्याकडे फलंदाज शिल्लक होते. त्यानंतर जिमी मैदानात आला आणि आक्रमक खेळी करत सामना फिरवला.”

या मोठ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंड संघाकडून प्रथम फलंदाजी करताना मोईन अलीने नाबाद ५१ धावांची तुफानी खेळी केली. तर डेविड मलानने ४१ आणि जोस बटलरने २९ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर इंग्लंड संघाला २० षटक अखेर ४ बाद १६६ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाकडून डॅरील मिशेलने सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली. तर डेवोन कॉनवेने ४६ धावांचे महत्वपूर्ण योगदान देत हा सामना न्यूझीलंड संघाला जिंकून दिला. न्यूझीलंड संघाने आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजय मिळवला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---