भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ 2024 टी20 विश्वचषकानंतर संपला. त्यांची जागा गौतम गंभीरनं घेतली आहे. आता राहुल द्रविड भविष्यात कोणत्या संघाचे कोच बनतील, यावर सातत्यानं चर्चा सुरु आहेत. त्यातच इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार इयॉन मॉर्गन यानं एक मोठं वक्तव्य केलं आहे. मार्गनच्या मते राहुल द्रविड यांनी इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचं मुख्य प्रशिक्षकपद सांभाळावं.
इंग्लंड क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक मॅथ्थ्यू शॉर्ट यांनी नुकत्याच आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्याजागी मार्कस ट्रेस्कोथिक यांची हंगामी कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वास्तविक, गेल्या काही काळापासून मर्यादित षटकांमध्ये इंग्लंडची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. इंग्लंडचा संघ त्यांचा एकदिवसीय आणि टी20 विश्वचषकाचा खिताब डिफेंड करू शकला नाही, ज्यानंतर मॅथ्थ्यू शॉर्ट यांनी राजीनामा दिला. आता इंग्लंड क्रिकेट बोर्ड नव्या मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे. यासाठी अनेक दिग्गजांची नाव पुढे येत आहेत. आता इयॉन मॉर्गननं राहुल द्रविड यांचं नाव सुचवून खळबळ उडवून दिली आहे.
‘स्काय स्पोर्ट्स’शी चर्चेदरम्यान इयॉन मार्गन म्हणाला की, त्याच्या मते राहुल द्रविड, रिकी पॉन्टिंग, स्टीफन फ्लेमिंग आणि ब्रँडन मॅक्युलम हे इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचे प्रमुख दावेदार आहेत. मॉर्गननं मॅक्युलमला सध्याच्या सर्वोत्तम प्रशिक्षकांपैकी एक म्हटलं आहे.
मॉर्गन म्हणाला की, “माझ्या मते यावेळी तुम्ही राहुल द्रविड, रिकी पॉन्टिंग, स्टीफन फ्लेमिंग आणि ब्रँडन मॅक्युलम यांचा विचार कराल. मी मॅक्युलमचं नाव यासाठी घेतोय, कारण ते जगातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकांपैकी एक आहे. तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की, इंग्लंड क्रिकेट टीम जगातील सर्वाधिक संसाधनं असलेल्या क्रिकेट टीमपैकी एक आहे. त्यामुळे आता हे बोर्डावर अवलंबून आहे की, त्यांनी मुख्य प्रशिक्षक म्हणून एखाद्या टॉप कोचला आणावं. यासाठी सध्या अनेक कोच उपलब्ध आहेत.”
हेही वाचा –
पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी काळ्या पट्ट्या का बांधल्या होत्या? बीसीसीआयने दिले मोठे कारण
केंद्र सरकार तंबाखूच्या छुप्या जाहिरातींवर कारवाई करण्याच्या मूडमध्ये, बीसीसीआयचं होणार कोट्यवधी रुपयांचं नुकसान?
आयपीएल 2025च्या मेगा लिलावात सीएसके धोनीला रिटेन करणार?