पुणे। पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले जागतिक रॅली मालिकेतील (डब्ल्यूआरसी) पदार्पणाची महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी आपली मोहीम इस्टोनियात शुक्रवारी सुरु करेल. इस्टोनियातील राष्ट्रीय रॅली मालिकेतील तिसऱ्या फेरीत तो सहभागी होईल. शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस ही रॅली होत आहे.
लॅट्वियाचा एडगर्स सेन्सीस संजयचा नॅव्हीगेटर आहे. एडगर्सला डब्ल्यूआरसीचा अनुभव असून त्याच्या घराण्यात रॅलीची परंपरा गेल्या दोन पिढ्यांपासून आहे.
संजय बाल्टीक मोटरस्पोर्टस प्रमोशनने तांत्रिकदृष्ट्या सुसज्ज केलेली फोर्ड फिएस्टा आर2 ही कार चालवेल. तो इएमव्ही2 या टू-व्हील ड्राईव्ह कारच्या गटात सहभागी होईल.
संजयने सांगितले की, ब्रिटनचे माजी विजेते ग्रॅहॅम मिडीलटन माझे प्रशिक्षक व मेंटॉर आहेत. मी याच महिन्यात पोर्तुगालमधील रॅलीत सहभागी व्हायचे ठरविले होते.
जागतिक रॅली मालिकेसाठी मी मित्सुबिशी मिराज आर5 ही कार घेतली आहे, पण ही कार अत्यंत वेगवान आणि शक्तीशाली आहे.
ती चालविण्यापूर्वी तुलनेने कमी क्षमतेची आर2 ही कार चालविणे उपयुक्त ठरेल असा सल्ला त्यांनी दिला. त्याचवेळी तयारीसाठी या दोन रॅलींची निवडही त्यांनी केली.
संजयसाठी नॅव्हीगेटरची निवड करण्यातही ग्रॅहॅम यांचे मत महत्त्वाचे होते. संजयला शनिवारी सायंकाळी इस्टोनियाचा व्हिसा मिळाला.
त्यानंतर तो सोमवारी लॅट्वीयाला रवाना झाला. त्याने बाल्टीक मोटरस्पोर्टसच्या सर्व्हिस सेंटरला भेट दिली.
तेथे त्याने मिडीलटन यांच्या मार्गदर्शनाखाली टेस्टिंग केले. संजय म्हणाला की, टेस्टिंगमध्ये मुलभूत गोष्टी अचूकतेने करण्यावर भर असतो.
मी एडगर्सबरोबर सुद्धा थोडे टेस्टिंग केले. त्याने जॅग्वार, व्होल्गा, सुबारू, स्कोडा फेबिया आर5 अशा कार चालविल्या आहेत. त्याने 2015 मध्ये माँटे कार्लो रॅली जिंकली होती.
गेल्या वर्षी संजयने न्यूझीलंडच्या मायकेल यंग याच्या साथीत इस्टोनियातच टार्टूमध्ये झालेल्या रॅलीत उपविजेतेपद मिळविले होते.
युरोपातील रॅलीत पदार्पणात करंडक जिंकण्याचा पराक्रम त्याने केला होता.
जागतिक रॅली मालिकेतील फिनलँड रॅलीच्या पूर्वतयारीसाठी होणाऱ्या ऑटो24 रॅली संयोजकांनी आशिया-पॅसिफीक रॅली मालिकेच्या प्रतिनिधीत्वासाठी संयोजक ब्रायन यंग यांना आमंत्रण पाठविले होते.
त्यावेळी संजय-माईकने काही स्टेजेसमध्ये ड्रायव्हर आणि नॅव्हीगेटर अशा दोन्ही भूमिका बजावल्या होत्या.
तेव्हा संजय युरोपमधील रॅलीत सहभागी होण्याच्या माफक उद्देशाने सहभागी झाला होता. त्यामुळे दुसरा क्रमांक बोनस ठरला होता. यावेळी संजयचे ध्येय सुस्पष्ट आहे.
हारजुमा रोड परिसरात रॅलीचा प्रारंभ जोर्ग ग्रॉस-रॅगो मोडरेर करतील. हारजू कौंटीमधील या रॅलीत आठ देशांते 71 स्पर्धक सहभागी झाले आहेत.
या रॅलीला एफआयए (फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल ऑटोमोबाईल) या आंतरराष्ट्रीय शिखर संघटनेची मान्यता आहे.
आंतरराष्ट्रीय क्रीडा संहिता, इस्टोनियन राष्ट्रीय क्रीडा नियमावली, इस्टोनियन रॅली मालिकेचे सर्वसाधारण नियम आणि रॅलीशी संबंधित नियम लागू आहेत.
थालीन रॅली
देश- इस्टोनिया
कालावधी 11-12 मे 2005
मालिका- इस्टोनियन रॅली मालिका (इस्टोनियन चँपीयनशीप)
फेरी- तिसरी
एकूण अंतर- 511 किलोमीटर 73 मीटर
अतिरीक्त स्टेजः 13
अतिरीक्त स्टेजेसचे एकूण अंतर- 100 किलोमीटर 60 मीटर
ट्रायलच्या पुनरावृत्तीची संख्या- 6
मार्गाचे स्वरुप- 98 टक्के वाळू, दोन टक्के सिमेंट
दिवसातील महत्त्वाच्या बातम्या-
–उद्याचा दिवस क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णांक्षरांनी लिहीला जाणार
–वनडेतील सर्वात अनुभवी खेळाडू करणार २०१९ला क्रिकेटला टाटा-बायबाय
–रोहितचा असाही एक विक्रम जो काल फारसा कुणाच्या ध्यानात आला नाही
–सगळे प्रयत्न करुन झाले पण केकेआरवर राज्य तर रोहित शर्माची मुंबईच करते!