युरोपियन फुटबॉल वर्तुळात आज (२० एप्रिल) एक ऐतिहासिक घटना घडली. फुटबॉल जगतातील तीन प्रमुख देश असलेल्या स्पेन, इंग्लंड आणि इटलीमधील १२ बड्या व्यावसायिक फुटबॉल संघांनी एकत्र येऊन नव्या लीगची घोषणा केली आहे. युरोपियन सुपर लीग असे या नव्या लीगचे नामकरण केले गेले. या घटनेमुळे फुटबॉलजगतात खळबळ उडाली आहे.
या संघांनी उभारली लीग
स्पेनमधील रिअल माद्रिद, बार्सिलोना व ऍटलेटिको दी माद्रिद, इंग्लिश प्रिमीयर लीगमधील मँचेस्टर सिटी, मँचेस्टर युनायटेड, लिव्हरपुल, आर्सनल, चेल्सी आणि टॉटनहॅम हॉटस्पर्स आणि इटलीतील यूवेंटस, इंटर मिलान आणि एसी मिलान या १२ संघांनी स्पर्धेची घोषणा केली. हे सर्व संघ युरोपातील सर्वात प्रतिष्ठीत संघ मानले जातात.
असे असेल स्पर्धेचे स्वरूप
या लीगमध्ये एकूण २० संघ सहभागी होतील. सहभागी संघांना २ गटांमध्ये विभागले जाईल. प्रत्येक संघ साखळी फेरीत एकमेकांशी होम-अवे अशा पद्धतीने खेळतील. दोन्ही गटातील पहिले ३ संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी सरळ पात्र होतील. गटामध्ये चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर राहिलेल्या संघांमध्ये प्ले ऑफ लढती होतील. प्ले ऑफ जिंकणारे संघ उपांत्यपूर्व फेरीत खेळतील.
संस्थापक असलेल्या १२ संघांनी लीगमध्ये कितीही खराब कामगिरी केली, त्यांनी अगदी शेवटच्या स्थानावर जरी लीगची अखेर केली तरी त्यांना दरवर्षी लीगमध्ये खेळता येईल.
मिळणार घसघशीत बक्षिस
या लीगमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला ३५० मिलियन युरो इतकी मोठी रक्कम मिळणार आहे. तर विजेत्या संघाला ५०० मिलियन युरो इतके बक्षिस दिले जाईल. युरोपमधील सर्वोच्च फुटबॉल लीग असलेल्या चॅम्पियन्स लीगच्या विजेत्याला या रकमेच्या तुलनेत अत्यंत कमी बक्षीस मिळते. सध्या चॅम्पियन्स लीग विजेत्याला केवळ १८३ मिलियन युरो इतके बक्षीस दिले जाते.
फिफाचा विरोध
फुटबॉल जगतातील मान्यवर क्लबनी सुरू केलेल्या या लीगला आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ म्हणजेच फिफा व युरोपियन फुटबॉलची सर्वेसर्वा यूएफा आणि युरोपातील प्रत्येक देशाच्या फुटबॉल संघटनेने विरोध केला आहे. या बंडखोर लीगमध्ये सहभागी होणाऱ्या संघाना त्या देशांच्या प्रमुख लीगमध्ये तसेच, खेळाडूंना फिफा विश्वचषकासह इतर आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास बंदी घालण्याचा इशारा फिफाने दिला आहे.