भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात एकतर्फी पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाने दुसऱ्या वनडेसह मालिकादेखील गमावली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ३८९ धावांची मोठी धावसंख्या रचली होती. प्रत्युत्तरात, भारतीय संघाने ९ विकेट्स गमावत ३३८ धावा केल्या. सामन्यादरम्यान, भारतीय कर्णधार विराट कोहलीने घेतलेल्या एका निर्णयाला माजी भारतीय वेगवान गोलंदाज डोडा गणेश याने ‘वेडेपणा’ म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी उभारली विशाल धावसंख्या
पहिल्या सामन्याप्रमाणेच ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दुसऱ्या सामन्यातही भारतीय गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. ऑस्ट्रेलियन सलामीवीरांनी १४२ धावांची सलामी दिल्यानंतर, इतर फलंदाजांनी उपयुक्त खेळी केल्या. ऑस्ट्रेलियाच्या सुरुवातीच्या पाचही फलंदाजांनी अर्धशतकापेक्षा जास्त धावा फटकावल्या. स्टीव स्मिथने सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले. विराट कोहलीला बळी मिळवण्यासाठी आपल्या गोलंदाजांना आलटून-पालटून संधी द्यावी लागत होती. भारतीय फलंदाज नियमित अंतराने बळी मिळवू शकत नसल्याने, विराटने सहावा गोलंदाज म्हणून चक्क सलामीवीर मयंक अगरवालकडे चेंडू सोपवला.
डोडा गणेशने केले ट्विट
मयंकने ऑस्ट्रेलियाच्या डावातील ३५ व्या षटकात गोलंदाजी केली. त्याच्या त्या षटकात १० धावा निघाल्या. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने त्याला पुन्हा गोलंदाजी दिली नाही. मात्र, विराटच्या या निर्णयावर माजी भारतीय वेगवान गोलंदाज डोडा गणेशने ट्विट करत, प्रतिक्रिया दिली.
गणेशने ट्विटमध्ये लिहिले, ‘मी मयंकला कर्नाटकच्या एकोणीस वर्षाखालील संघापासून ओळखतो. विश्वास ठेवा, कर्नाटक संघाने त्याला कधीही गोलंदाज म्हणून पाहिले नाही. तो नेटमध्ये अत्यंत कमी गोलंदाजी करतो. आज तोच भारताचा आंतरराष्ट्रीय सामन्यात सहावा गोलंदाज म्हणून गोलंदाजी करतोय.’ याच ट्विटच्या अखेरीस त्याने ‘क्रेझी’ असा हॅशटॅग लिहिला आहे.
I’ve seen Mayank Agarwal from his Karnataka U-19 days. Trust me, the Karnataka think tank never considered Mayank as a bowling option. I’ve hardly seen him even bowling in the nets. And now he’s the sixth bowling option for India in the ODIs #Crazy #DoddaMathu #AUSvIND
— Dodda Ganesh | ದೊಡ್ಡ ಗಣೇಶ್ (Modi Ka Parivar) (@doddaganesha) November 29, 2020
सेहवागनेही केला मयंकच्या गोलंदाजीविषयी खुलासा
गणेशव्यतिरिक्त सामन्यादरम्यान समालोचन करत असलेल्या माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने देखील विराटच्या निर्णयावर नापसंती दर्शवली होती. समालोचन करताना तो म्हणाला, ‘मी आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा दोन वर्ष प्रशिक्षक होतो. त्यावेळी मयंक पंजाबचा सदस्य होता. या दोन वर्षात त्याने नेट्समध्ये एकही चेंडू टाकला नव्हता.’
भारतीय संघाला पहिल्या वनडे सामन्यात सहाव्या गोलंदाजांची उणीव भासली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात सहावा आणि सातवा गोलंदाज म्हणून मयंक अगरवाल व हार्दिक पंड्या यांनी गोलंदाजी केली. हार्दिक शतकवीर स्टीव स्मिथचा बळी मिळविण्यात यशस्वी ठरला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘ऑस्ट्रेलियाने आम्हाला चित केले’, मालिका गमावल्यानंतर विराटची प्रतिक्रिया
अफलातून ! हेन्रीक्सने विराटचा घेतला जबरदस्त झेल, पाहा व्हिडिओ
IND vs AUS : प्रेमासाठी काय पण! भावाने चालू सामन्यात तरूणीला केलं प्रपोज, पाहा तिची प्रतिक्रिया
ट्रेंडिंग लेख-
बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचे टी२० क्रिकेटमधील सर्वात मोठे तीन विजय
पाच नाही; सहा नाही, तब्बल १० देशांत कसोटी शतके करणारे जगातील २ फलंदाज
भारताने ९८८ वनडे सामने खेळले, पण ‘असा’ नकोसा विक्रम पहिल्यांदाच झाला