कोलकता: हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) गतविजेता एटीके आणि चेन्नईयीन एफसी यांच्यात गुरुवारी उत्कंठावर्धक लढत होत आहे. एटीके जेतेपद अजूनही राखू शकतो असा विश्वास हंगामी प्रशिक्षक अॅश्ली वेस्टवूड यांना वाटतो.
तीन मोसमांत दोन वेळा विजेता ठरलेला एटीके हा हिरो आयएसएलमधील सर्वाधिक यशस्वी संघ आहे. यंदा मात्र 10 सामन्यांतून केवळ 12 गुण मिळाल्यामुळे हा संघ आठव्या क्रमांकावर आहे. अशा ढिसाळ कामगिरीमुळे एटीके आणि मुख्य प्रशिक्षक टेडी शेरींगहॅम यांनी परस्पर सहमतीने करार संपविला. यानंतरही मोसमातील आशा आटोपल्या नसल्याचे वेस्टवूड यांना वाटते.
एटीकेसमोर विजयांची संख्या वाढविण्याचे मुख्य आव्हान आहे. त्यांना दहा पैकी केवळ तीन सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर चेन्नईला सामोरे जाताना एटीकेसमोर कडवे आव्हान असेल.
वेस्टवूड यांनी सांगितले की, आम्हाला मोठ्या प्रमाणावर बदल करण्याइतका वेळ नाही, पण आम्ही संघातील वातावरण ताजेतवाने करू शकू अशी आशा आहे. नव्या चेहऱ्यांमुळे परिस्थिती काहीशी बदलू शकते.
वेस्टवूड यांची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. भारतीय फुटबॉलमध्ये ते लोकप्रिय आहेत. बेंगळुरू एफसीबरोबर त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ फलदायी ठरला. आयएसएल संघाची सूत्रे तात्पुरती स्वीकारणे त्यांच्यासाठी नवा अनुभव असेल, पण ते आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज आहेत.
वेस्टवूड यांनी सांगितले की, मी तात्पुरत्या कालावधीसाठी प्रमुख आहे. मी पूर्वी मुख्य प्रशिक्षक राहिलो आहे. चार वर्षे मी मार्गदर्शन केले. यातील तीन वर्षे मी भारतात पूर्णवेळ सक्रिय होतो. त्यामुळे मला यात कोणतीही अडचण वाटत नाही. मी जे काही करतो ते आत्मविश्वासाने करतो. मला संघाच्या क्षमतेविषयी आत्मविश्वास वाटतो. हा फुटबॉलचाच एक भाग असतो आणि यात काहीच अजिबात अवघड नसते.
स्टार स्ट्रायकर रॉबी किन दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याची माहिती त्यांनी दिली. वेस्टवूड यांची सलामीलाच कडवी अग्निपरीक्षा होईल. चेन्नई 11 सामन्यांतून 20 गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहे. एटीकेपेक्षा दुप्पट सामने त्यांनी जिंकले आहेत.
जॉन ग्रेगरी तीन सामन्यांच्या बंदीनंतर संघाची सूत्रे स्वीकारण्यासाठी परतले आहेत. मागील सामन्यात नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध चेन्नईला पराभूत व्हावे लागले. आता नॉर्थईस्टप्रमाणे विजय मिळवून एटीके वेस्टवूट यांच्या आगमनानंतर मोहिमेत जान आणणार नाही अशी आशा ग्रेगरी यांना आहे.
ग्रेगरी यांनी सांगितले की, काही वेळा अशा गोष्टी घडतात की नवा माणूस येतो आणि अचानक सगळी परिस्थिती बदलून जाते. दोन आठवड्यांपूर्वी नॉर्थईस्टच्या बाबतीत असे घडल्याचे आपण पाहिले. माझे चांगले मित्र अॅव्रम ग्रँट तेथे आले आणि त्यांनी एफसी गोवाविरुद्ध आश्चर्यकारक विजय मिळविला. काही वेळा असे बदल यशस्वी ठरतात, तर काही वेळा तसे होत नाही. एटीकेच्या बाबतीत तसे घडू नये म्हणून मला प्रयत्न करावे लागतील.
एटीकेने मोसमाच्या प्रारंभापासून केलेल्या कामगिरीविषयी ग्रेगरी यांनी कौतुकाचे उद्गार काढले. या उत्कंठावर्धक लढतीला सामोरे जाण्यास आतुर असल्याचे त्यांनी नमूद केले.
ते म्हणाले की, मी आणि माझे सर्व खेळाडू एटीके म्हणजे भारताचा मँचेस्टर युनायटेड अशा दृष्टीने पाहतो. एटीके हा भव्य क्लब आहे. अर्थातच ते दोन वेळचे विजेते आहेत. आम्ही एकदा विजेते ठरलो आहोत, पण तरी सुद्धा एटीकेकडे आदर्श म्हणून बघतो. उद्या एटीकेविरुद्ध लढत असल्यामुळे 25 खेळाडूंची खेळण्याची इच्छा आहे.
सर्व खेळाडू जिद्दीने सज्ज झाले आहेत. मोसमाच्या प्रारंभी वेळापत्रक जाहीर झाले तेव्हा मी पहिला प्रश्न हाच विचारला होता की, आपण एटीकेविरुद्ध कधी खेळणार आहोत. इंग्लंडमध्ये असेच घडते, आपला मँचेस्टर युनायटेडशी सामना कधी आहे याची उत्सुकता प्रत्येकाला असते.
पहिल्या टप्यातील सामन्यात चेन्नईमध्ये चेन्नईयीनने 3-2 असा विजय मिळविला होता. हा आपल्या संपूर्ण कारकिर्दीमधील सर्वाधिक आकर्षक सामन्यांमध्ये असल्याचे वर्णन ग्रेगरी यांनी केले होते.