कसोटी क्रिकेटमध्ये अनेकदा धावा करण्यापेक्षा चेंडू खेळून काढणे महत्वाचे असते, असे विधान भारताचा मधल्या फळीतील चेतेश्वर पुजारा याने केले आहे. पुजारावर नेहमीच त्याच्या संथ खेळावरून टीका होत असते. त्याच पार्श्वभूमीवर त्याने हे विधान केले आहे. पुजाराच्या मते स्ट्राईक रेटला अवास्तव महत्व दिले जाते. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी पीटीआयशी तो बोलत होता.
“ऑस्ट्रेलियातील दोन्ही दौरे महत्वाचे”
दोन वर्षापूर्वीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुजाराने धावांचा रतीब घातला होता. यावेळच्या दौऱ्यातही भारतीय संघासाठी त्याने अतिशय महत्वपूर्ण योगदान दिले. पुजाराने धावांच्या दृष्टीने फारसे मोठे योगदान दिले नसले, तरी सिडनी कसोटी आणि ब्रिस्बेन कसोटीतील पुजाराची झुंजार खेळी भारतासाठी निर्णायक होती.
यावर बोलताना पुजारा म्हणाला, “दोन्ही दौरे संघासाठी उत्तम ठरले आणि माझ्यासाठी देखील वैयक्तिक दृष्ट्या हे दौरे यशस्वी ठरले. मात्र या दौऱ्यात परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. कोरोना महामारीनंतर आठ महिन्यांनी मी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामना खेळत होतो. त्याआधी मी कुठला प्रथम श्रेणी सामना देखील खेळलो नव्हतो.”
या दौऱ्यातील आव्हानांविषयी बोलताना तो म्हणाला, “तयारीच्या दृष्टीने हा दौरा नक्कीच आव्हानात्मक होता. आणि विशेषतः ऑस्ट्रेलियन संघ आमच्यातील प्रत्येकासाठी वेगळी रणनिती घेऊन उतरला होता. त्यामुळे फॉर्मात यायला जरा वेळ लागला, मात्र सुदैवाने शेवट सकारात्मक झाला.”
“स्ट्राईक रेटला दिले जाते अवाजवी महत्व”
पुजारावर या दौऱ्यात संथ गतीने फलंदाजी केल्याबद्दल अनेकांनी टीका केली. यावर बोलताना तो म्हणाला, “अनेकदा केवळ स्ट्राईक रेटलाच महत्व नसते. प्रत्येक फलंदाजाची एक वेगळी भूमिका असते. संघ व्यवस्थापनाला याची जाणीव आहे. त्यांनी मला कायमच माझ्या पद्धतीने फलंदाजी करण्यासाठी पाठिंबा दिला.”
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील ऐतिहासिक यशानंतर भारतीय संघ आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. मायदेशात खेळवल्या जाणाऱ्या या मालिकेत चेतेश्वर पुजाराची भूमिका भारतासाठी महत्वाची असेल.
महत्वाच्या बातम्या:
बुमराहने केलेली नक्कल पाहून कुंबळेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले
नमोंनी भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरीचं केलं कौतुक, रवी शास्त्री म्हणाले
भारत विरुद्ध इंग्लंडच्या मालिकेत कोणत्या संघाचे पारडे जड? इयान चॅपेल यांनी वर्तवला अंदाज