जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चौदाव्या हंगामातील साखळी फेरीचे संपन्न झाल्यानंतर पहिला क्वालिफायर सामनादेखील खेळला गेला. या सामन्यात चेन्नईने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. चेन्नईच्या या यशामध्ये सलामीवीर फाफ डू प्लेसिस व ऋतुराज गायकवाड यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. जवळपास प्रत्येक सामन्यात या दोघांनी संघाला जबरदस्त सलामी देत विजयाची पायाभरणी केली. या सलामीनंतर आता त्यांच्या नावे एक नवा विक्रम होण्याच्या मार्गावर आहे.
सर्वात जबरदस्त सलामीवीर ठरले प्लेसिस व ऋतुराज
पहिल्या क्वालिफायर सामन्यात दिल्लीला पराभूत करताना चेन्नईने विक्रमी दहाव्यांदा आयपीएलची अंतिम फेरी गाठण्याचा कारनामा केला. चेन्नईला या हंगामात प्लेसिस व ऋतुराज गायकवाड या जोडीने नेहमीच आश्वासक सुरुवात दिली. दोघांनीही ४६.३३ अशा जबरदस्त सरासरीने ६९५ धावा काढून दिल्या आहेत. १५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात अशीच एक तुफान सलामी देत या वर्षीचा एक मोठा विक्रम आपल्या नावे करण्याची संधी या दोघांकडे असेल.
बाबर रिझवानचा विक्रम दृष्टिक्षेपात
आयपीएल २०२१ च्या अंतिम सामन्यात फाफ व ऋतुराज ही जोडी पाकिस्तानचा बाबर आझम व मोहम्मद रिझवान या जोडीचा चालू वर्षात सर्वाधिक धावांच्या सलामीचा विक्रम मोडू शकते. या दोघांनीही पाकिस्तानसाठी यावर्षी खेळताना ५६.६१ च्या अप्रतिम सरासरीने ७३६ धावा चोपल्या आहेत. या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी दिल्ली कॅपिटल्सचे व भारतीय संघाचे सलामीवीर शिखर धवन व पृथ्वी शॉ यांचा समावेश आहे. दोघांनीही चालू वर्षी ४७.४६ च्या सरासरीने ७१२ धावांची लयलूट केली असून, तेदेखील दुसऱ्या क्वालिफायरमध्ये फलंदाजी करताना दिसतील. स्पर्धेतून बाहेर झालेल्या पंजाब किंग्सचे सलामीवीर केएल राहुल व मयंक अगरवाल या यादीमध्ये चौथ्या स्थानी असून, त्यांनी एकत्रितपणे ६०२ धावांचे सलामीला योगदान दिले आहे.





