भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. रविवारपासून (१३ सप्टेंबर) सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. हे तिन्ही सामने दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. विशेष म्हणजे, या मालिकेचा यजमान भारत नसून अफगाणिस्तान आहे आणि पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वैभव सूर्यवंशीवर असणार आहे. ही मालिका त्याच्यासाठीही खास असणार आहे, कारण तो या मालिकेदरम्यान भारतात टी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण करेल.
आपल्याला माहितच आहे, वैभवने त्याचे टी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण इंग्लंड दौऱ्यात केले होते. जुलै महिन्यात खेळल्या गेलेल्या त्या पाच सामन्यांच्या मालिकेत भारताच्या युवा स्फोटक फलंदाजाने दुसऱ्या सामन्यातून आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. मॅनचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात वैभव १० चेंडूत दोन षटकार मारत १४ धावांवर बाद झाला. आता तो भारतात पहिल्यांदा भारतासाठी खेळताना दिसणार आहे. हा क्षण त्याच्याबरोबर चाहत्यांसाठीही खास असणार आहे.
वैभवची टी२० आंतरराष्ट्रीय कामगिरी पाहिली तर त्याने आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने दोन अर्धशतकांसह १९३ धावा केल्या आहेत. इंग्लंड आणि झिम्बाब्वेची मैदाने गाजवल्यानंतर आता वैभव टीम इंडियाच्या जर्सीमध्ये भारताचे मैदान गाजवण्यास सज्ज झाला आहे. एकदा नजर टाकू त्याच्या भारतातील टी२० कामगिरीवर.
वैभवने भारतात आतापर्यंत ३० टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये २३ आयपीएल आणि सात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सामन्यांचा समावेश आहे. यादरम्यान त्याने २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने १००० पेक्षा अधिक धावा केल्या. यामध्ये तीन शतकांचाही समावेश आहे. भारतीय मैदानावर त्याची ही भन्नाट आकडेवारी हेच सिद्ध करते की तो किती धोकादायक फलंदाज आहे.
वैभवने त्या ३० सामन्यांमध्ये ४२.६८च्या सरासरीने १२३८ धावा केल्या आहेत. यामधील दोन आयपीएल शतके आणि एका सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या शतकाचा समावेश आहे.
अफगाणिस्तान विरुद्ध भारत यांच्यात खेळला जाणारा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:३०वाजता सुरू होईल. (Vaibhav Sooryavanshi will makes his T20 International debut in India today; AFG vs IND T20 Series)






