दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस द हंड्रेडमध्ये एकही सामना खेळू शकला नाही. प्लेसिसला पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळताना दुखापत झालेली. त्यानंतर तो कन्कशनच्या धक्क्यातून सावरू शकला नाही आणि द हंड्रेडमधून बाहेर पडला. प्लेसिसने आतापर्यंत नॉदर्न सुपरचार्जर्स संघासोबत वेळ घालवला. मात्र, आता त्याने कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी घरी परतण्याचा निर्णय घेतला. प्लेसिसने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर सुपरचार्जर्स संघासाठी दीर्घ पोस्ट लिहून पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले. प्लेसिसने खुलासा केला की, तो वेस्ट इंडिजमध्ये आगामी कॅरेबियन प्रिमियर लीग (सीपीएल) स्पर्धेत दिसणार आहे.
संघासाठी लिहिले भावनिक पत्र
प्लेसिसने लीगमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आपल्या संघासाठी भावनिक पत्र लिहिले. त्याने लिहिले, ‘दुर्दैवाने मी घरी जात आहे. कारण मी कन्कशनच्या धक्क्यातून सावरलो नाही आणि यावर्षी द हंड्रेडमध्ये नॉदर्न सुपरचार्जर्समध्ये खेळू शकणार नाही. अनेक प्रतिभावंत व अनुभवी खेळाडूंचा खेळ मी यादरम्यान पाहिला. मी ईसीबी, नॉदर्न सुपरचार्जर्स आणि प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो. माझ्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देत मला स्पर्धा सोडण्यासाठी परवानगी दिली.”
प्लेसिसने पुढे लिहिले,
“या दुखापतीच्या काळात तुम्ही सर्वांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी मी सर्वांचा आभारी आहे आणि मला वाटते की, मी लवकरच पुन्हा खेळायला सुरुवात करेन. पुढील वर्षी द हंड्रेड लीगमध्ये खेळण्याची माझी इच्छा आहे. सध्या काही दिवस घरी राहून कुटुंबाला मी वेळ देईल. त्यानंतर सीपीएलसाठी रवाना होईल. खूप प्रेम.’
पाकिस्तान सुपर लीगमध्ये साखळी सामन्यात डोक्याला चेंडू लागल्याने प्लेसिसला कन्कशनचा त्रास झालेला. तेव्हापासून तो मैदानात उतरला नाही. सीपीएलनंतर प्लेसिस आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व करेल.
https://www.instagram.com/p/CSg4atoqlw4/
स्टोक्स आणि विलीने केले नेतृत्व
द हंड्रेड लीगमध्ये नॉदर्न सुपरचार्जर्स संघाचा कर्णधार म्हणून प्लेसिसची निवड करण्यात आली होती. तो उपलब्ध नसल्याने सुरुवातीच्या सामन्यात इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स याने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली. स्टोक्सने मानसिक स्वास्थाचे कारण देत स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर सध्या वेगवान गोलंदाज डेव्हिड विली संघाचे नेतृत्व करत आहे. सुपरचार्जर्सने आतापर्यंत सात सामने खेळताना ७ गुण मिळवले असून, ते गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑक्टोबर महिन्यात इंग्लंड करणार ‘या’ देशाचा दौरा; टी२० विश्वचषकाची तयारी सुरू
डाव्या हाताने क्रिकेटमध्ये उजवी कामगिरी करणारे दिग्गज भारतीय खेळाडू, पाहा खास आकडेवारी