केपटाउन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान संघात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने पहिल्या डावात शतक केले आहे.
त्याने या डावात 226 चेंडूत 103 धावांची खेळी केली आहे. यात त्याने 13 चौकार मारले. हे शतक त्याचे कसोटी कारकिर्दीतील 9 वे शतक आहे. या 9 शतकांपैकी 4 शतके त्याने विशिष्ट वेळी केले आहेत. त्यामुळे ती त्याची खास शतकं ठरली आहेत.
यातील पहिले शतक त्याने अॅडलेड ओव्हल मैदानावर त्याच्या कसोटी पदार्पणाच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथ्या डावात केले होते.
तसेच अॅडलेड ओव्हल मैदानावरच त्याने नोव्हेंबर 2016ला दिवस रात्र कसोटी सामना खेळताना त्याचे 6 वे कसोटी शतक केले होते. हे शतकही त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच केले होते.
विशेष म्हणजे या शतकाच्या आधीच्या सामन्यात त्याच्यावर चेंडूला लाळेतून मिंट लावण्याचा आरोप झाला होता, त्यावेळी त्याच्यावर एका सामन्यातील मॅच फिचा दंड आणि तीन डिमिरीट पॉइंट्ंस देण्यात आले होते.
त्यानंतर त्याने 2017 मध्ये जोहान्सबर्गमध्ये त्याच्या कारकिर्दीतील 8 वे शतक केले. हे शतकही त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच केले. त्यावेळी स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट यांचा समावेश असणारे केपटाउन कसोटीतील चेंडू छेडछाड प्रकरण चांगलेच गाजले होते. या केपटाउन कसोटीनंतर त्याने जोहान्सबर्ग येथे शतक केले होते.
याबरोबरच आज पाकिस्तान विरुद्ध केलेले शतकही त्याच्यासाठी खास ठरले आहे. कारण तो पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावात शून्य धावेवर बाद झाला होता. त्यानंतर त्याने लगेचच दुसऱ्या सामन्यात शतकी खेळी केली आहे.
या सामन्यात त्याचे शतक आणि तेंबा बाउमा(75) आणि क्विंटन डीकॉक(59) यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात सर्वबाद 431 धावा केल्या आहेत. तत्पूर्वी पाकिस्तानने पहिल्या डावात सर्वबाद 177 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–१९ तासांत ४ लाख लाईक्स मिळालेला पंतचा तो फोटो पाहिला का?
–रिषभ पंतच्या रूपाने टीम इंडियाला मिळाला ऍडम गिलख्रिस्ट…
–या संघसहकाऱ्यामुळे रिषभ पंतने केली दिडशतकी खेळी
–रिषभ पंतच्या त्या विक्रमाची चर्चा आजही देशात सुरुच