अनेकदा काही कुटुंबांतील किंवा घराण्यातील खेळाडू क्रिकेटमध्ये दिसणे सामान्य गोष्ट आहे. लोकप्रिय भाऊ आणि पिता-पुत्रांच्या जोड्यातर क्रिकेटविश्वात खूप पाहिल्या आहेत. याच रक्ताच्या नात्या बरोबर, बऱ्याच कर्तृत्ववान क्रिकेटपटूंमध्ये इतरही अनेक प्रकारचे नातेसंबंध असलेले दिसतात.
अशा खेळाडूंचे नातेसंबंध क्रिकेटविश्वाला जास्त ज्ञात नाहीत. अशाच १० कौटुंबिक नातेवाईक असलेल्या खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.
सुनील गावसकर आणि गुंडाप्पा विश्वनाथ
७० च्या दशकात भारतीय क्रिकेटमध्ये फलंदाज म्हणून सुनील गावसकर आणि गुंडप्पा विश्वनाथ ही दोन नावे प्रसिद्ध होती. दोघांपैकी श्रेष्ठ कोण? असा वाद चाहत्यांमध्ये उडत असत. कोणाची फलंदाजी अधिक तंत्रशुद्ध आहे तर कोणाचे विजयातील योगदान जास्त आहे याविषयी अनेक मतमतांतरे आहेत.
या दोन दिग्गजांमध्ये मैदानावरील भागीदारी व्यतिरिक्त अजून एक संबंध आहे. गुंडप्पा विश्वनाथ हे सुनील गावसकर यांची बहिण कविता यांचे पती आहेत. सुनील गावसकर आपल्या सहकाऱ्याला इतका आदर देत की, त्यांनी आपल्या मुलाचे नाव रोहन जयविश्वा गावसकर असे ठेवले.
आपल्या मुलाचे असे नाव ठेवण्यामागे गावसकर यांचा हेतू, त्यांचे आदर्श रोहन कन्हाय, एमएल जयसिम्हा व गुंडप्पा विश्वनाथ यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करणे हा होता .
ब्रायन लारा आणि डॅरेन ब्रावो
२००९ मध्ये वेस्टइंडीजच्या डॅरेन ब्रावोने भारताविरुद्ध पदार्पण केले तेव्हा त्याची खेळण्याची शैली, त्याचे स्क्वेअर कट या गोष्टी वेस्टइंडीजचा दिग्गज ब्रायन लारा याच्याशी मिळत्याजुळत्या होत्या.
ब्रावोच्या या समानतेचे कारण लाराशी असलेले नाते होते. डॅरेनचा मोठा सावत्रभाऊ ड्वेन ब्रावो हासुद्धा वेस्टइंडीजचा खेळाडू होता. डॅरेन ब्राव्हो व ब्रायन लारा हे एकमेकाचे मावस भाऊ आहेत.
बाबर आझम आणि अकमल बंधू
पाकिस्तानी क्रिकेटमध्ये अकमल बंधू यांचे विशेष योगदान आहे. कामरान, उमर आणि अदनान अकमल या तिघांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. या तिघांप्रमाणे, त्यांच्याच कुटुंबातील एक युवा खेळाडू सध्या पाकिस्तान क्रिकेटचे नेतृत्व करत आहे तो खेळाडू म्हणजे बाबर आझम.
भविष्यातील पाकिस्तानचा सर्वात मोठा खेळाडू बनण्याच्या मार्गावर असलेला बाबर हा अकमल बंधूच्या मावशीचा मुलगा आणि अकमल बंधूच्या परिवारातील सदस्य आहे. यासोबत उमर अकमल हा पूर्व पाकिस्तानी खेळाडू अब्दुल कादिर याचा जावई आहे.
अॅलेक स्टीवर्ट आणि मार्क बुचर
इंग्लिश क्रिकेटमधील सर्वात प्रसिद्ध कथांपैकी एक म्हणजे मार्क बुचर यांचे वैयक्तिक आयुष्य. डाव्या हाताच्या या फलंदाजाने त्याचा सरे आणि इंग्लंड संघाचा साथीदार अॅलेक स्टीवर्टची बहीण जुडी हिच्याशी लग्न केले.
अजय जडेजा आणि नवानगर राजघराणे
अजय जडेजा याचे जन्मनाव अजयसिंहजी जडेजा हे आहे. हे बर्याचजणांना माहिती नाही. नवानगरच्या राजघराण्याचे व भारतीय क्रिकेटचे खूप जुने संबंध आहेत. अजय जडेजासुद्धा याच नवानगर राजघराण्यातील सदस्य आहे.
भारतीय क्रिकेटचे पितामह असलेले रणजीत सिंग जी आणि दुलीप सिंग जी हे याच नवानगर राजघराण्याचे महाराज होत.
महेंद्र नागामुट्टू आणि रोहन कन्हाय / अल्विन कालिचरण
२००० च्या दशकाच्या सुरुवातीला वेस्टइंडीज कडून खेळणारे महेंद्र नागामुट्टू हे वेस्टइंडीजचे महान खेळाडू रोहन कन्हाय व अल्विन कालिचरण यांचे पुतणे होत. भारतीय वंशाच्या या कुटुंबाने अनेक वर्ष वेस्टइंडीज क्रिकेटची सेवा केली आहे.
महेंद्र यांच्याप्रमाणेच, त्यांचे बंधू विशाल नागामुट्टू हेदेखील क्रिकेटर होते. परंतु राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यात त्यांना अपयश आले.
यशपाल शर्मा आणि चेतन शर्मा
भारतातर्फे पहिली हॅट्रिक घेणारे तसेच जावेद मियादाद कडून शेवटच्या चेंडूवर षटकार खाणारे गोलंदाज म्हणून ज्यांची ख्याती आहे असे चेतन शर्मा हेदेखील भारताचे माजी खेळाडू यशपाल शर्मा यांचे पुतणे आहेत.
यशपाल शर्मा हे भारताच्या १९८३ सालच्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य होते. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात यशपाल शर्मा यांचे बहुमूल्य योगदान होते.
डॅरेन लेहमन आणि क्रेग व्हाईट
ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डॅरेन लेहमन व इंग्लिश खेळाडू क्रेग व्हाईट हे वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधित्व करत असताना देखील एकमेकांचे नातेवाईक आहेत.
क्रेग व्हाईट याची बहिण आंद्रिया ही डॅरेन लेहमन याची पत्नी आहे.
व्हाईट व लेहमन एकाच काउंटी क्लबसाठी खेळत असताना ,आंद्रिया आणि लेहमन यांचे प्रेम प्रकरण सुरु होऊन त्यांनी लग्न केले.
या लग्नानंतर, व्हाईट आणि लेहमन सहा वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आमने सामने आले. यात व्हाईटने लेहमनला तीन वेळा बाद केले.
मुशफीकुर रहिम आणि महमुद्दुला
असे म्हटले जाते की मैदानावर प्रवेश केल्यावर तेथे कोणीही मित्र किंवा शत्रू नसते, पण, कुटूंबाचा सदस्यच संघाची कप्तानी करत असेल तर मात्र अनेक प्रश्न उभे केले जातात आणि याचा खूप त्रास होतो. बांगलादेशचा कर्णधार मुशफिकुर रहीमला याचा चांगला अनुभव आहे. कारण, संघ सहकारी महमुदुल्ला त्याचा मेहुणा आहे.
कसोटी सामन्यात महमूदुल्लाच्या खराब कामगिरीनंतरही, बांगलादेशच्या कर्णधाराशी असलेल्या वैयक्तिक संबंधामुळे तो संघात असल्याची अफवा पसरली होती.
मिचेल स्टार्क आणि एलीसा हेली/ इयान हिली
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज यष्टीरक्षक इयान हिली याची पुतणी ऑस्ट्रेलियन महिला संघाची यष्टीरक्षक एलिसा हिली ही ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याची पत्नी आहे.
२०२० च्या महिला टी२० विश्वचषका वेळी चालू दौऱ्यातून स्टार्क आपल्या पत्नीला खेळ पाहण्यासाठी हजर झाला होता.