भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या तीन सामन्याच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला. पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाने मालिकेतील पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाचा बदला घेत हा सामना 10 विकेट्सने खिशात घातला. या सामन्यात भारताचे सर्वच फलंदाज अपयशी ठरले. सलग दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचे प्रमुख फलंदाज डगमगल्याने आता सोशल मीडियावर चाहते संजू सॅमसन याला संघात स्थान देण्याची मागणी करत आहेत.
विशाखापट्टणम येथे झालेल्या दुसऱ्या वनडेत भारतीय संघ अवघ्या 117 धावांवर गारद झाला. पहिल्या सामन्यातही भारताने आपले आघाडीचे चार फलंदाज स्वस्तात गमावले होते. असे असताना संजू सॅमसन याला का संधी दिली जात नाही,? असा प्रश्न चाहत्यांनी विचारण्यास सुरुवात केली आहे. खास करून सूर्यकुमार यादव सातत्याने अपयशी ठरत असल्याने, संजूला संधी देण्यात यावी असे अनेकांनी म्हटले.
संजू सॅमसन याला चांगली कामगिरी केल्यानंतर ही वनडे संघात जागा मिळाली नाही. त्याने आपल्या कारकीर्दीत आतापर्यंत 10 वनडे सामने खेळताना 66 च्या सरासरीने 330 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सध्याच्या भारतीय संघातील कोणत्याच फलंदाजाची सरासरी त्याच्या इतकी नाही.
सध्या संजू आयपीएल 2023 ची तयारी करत आहे. तो आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व करेल. मागील वर्षी त्याच्या नेतृत्वात राजस्थान संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. यावेळी विजेतेपद पटकावण्याचा त्याचा इरादा असेल. याव्यतिरिक्त फलंदाज म्हणून देखील उत्कृष्ट कामगिरी केल्यास, आगामी वनडे विश्वचषकासाठी त्याच्या नावाचा विचार होऊ शकतो. भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे.
(Fans Wanting Sanju Samson In India ODI Sqaud For Suryakumar Yadav)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी अस ऐकलंय की, ही धोनीची शेवटची आयपीएल आहे…’, कॅप्टन कूलविषयी काय म्हणाला शेन वॉटसन?
जेमिसनच्या जागी सिसांडा मगाला सीएसकेच्या ताफ्यात, जाणून घ्या नवख्या खेळाडूवर विश्वास दाखवण्याचे कारण