‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठे नाव आहे. जवळजवळ फलंदाजीतील सर्वच विक्रम त्याच्या नावावर आहेत. सचिनने २४ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वत: चे व देशाचे नाव उज्वल केले आहे. सचिन स्वभावाने शांत असला तरी मैदानावर तितकाच आक्रमकतेने खेळायचा.
सचिनने अनेक वेळा भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी साकारल्या आहेत. एक काळ असा होता की सचिन तेंडुलकर बाद झाल्यानंतर दर्शक टीव्ही आणि रेडिओ बंद करायचे. त्याची फलंदाजी बघायला स्टेडियम गच्च भरून जायचे. त्याने खेळले काही डाव आजही चाहत्यांच्या स्मरणात आहेत. म्हणून या लेखात सचिन तेंडुलकरच्या अशा तीन खेळींचा उल्लेख आहे जे चाहते कधीही विसरणार नाहीत.
सचिन तेंडुलकरचे हे ३ डाव चाहते नेहमीच लक्षात ठेवतील.
९८ धावा विरुद्ध पाकिस्तान – २००३ विश्वचषक
२००३ विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यातील सचिनने खेळलेली ही खेळी खास आहे. कारण भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध धावांचा पाठलाग करताना हा सामना जिंकला होता. यात सचिनने ७५ चेंडूत ९८ धावा फटकावत पाकिस्तानच्या शोएब अख्तरसह सर्व गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला होता. हा सामना भारतीय संघाने जिंकला आणि सचिनची खेळी अविस्मरणीय ठरली.
११४ धावा विरुद्ध बांगलादेश – २०१२ एशिया कप
सचिन तेंडुलकरने खेळलेल्या डावांमध्ये हा एक डाव विशेष आहे कारण हे त्याचे १०० वे आंतरराष्ट्रीय शतक होते. २०१२ मध्ये बांगलादेशविरूद्ध खेळताना मीरपूरच्या शेर ए बांगला स्टिडीममध्ये शानदार कामगिरी करत त्याने हा पराक्रम केला. सचिनने हे शतक १६ मार्च २०१२ रोजी एशिया कपच्या चौथ्या सामन्यात केले होते. या सामन्यात सचिनने १४७ चेंडूत ११४ धावांची धीमी खेळी केली होती. या दरम्यान त्याने १२ चौकार आणि १ षटकार लगावला होता. सचिनची ही खेळी चाहत्यांसाठी त्याचे १०० वे शतक असल्याने खास होती. त्यामुळे ही एक खेळी सचिनच्या चाहत्यांच्या आठवणीतली खेळी नक्की असेल.
नाबाद २०० धावा विरुद्ध दक्षिण आफ्रिका – २०१०
ग्वाल्हेर येथे २४ फेब्रुवारी २०१० रोजी सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वनडेतील पहिले द्विशतक ठोकले. त्यावेळी तो वनडे क्रिकेटमध्ये दुहेरी शतक ठोकणारा जगातील पहिला फलंदाज ठरला होता. २०० धावा करून नाबाद असलेल्या सचिनला या डावात १४७ चेंडूंचा सामना करावा लागला. त्याने या खेळीत २५ चौकार आणि ३ षटकार लगावले. त्यावेळी वनडेत पहिल्यांदाच एका फलंदाजाने २०० चा आकडा गाठल्याने इतिहास रचला गेला होता. तो इतिहासही सचिनने रचल्याने ही खेळीही चाहत्यांच्या स्मरणात नेहमी राहिली.