महिला विश्वचषक 2025 (ICC womens world cup final INDW vs SAW) मध्ये भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत विजेतेपद पटकावले. लीग स्टेजमध्ये भारतीय संघाला सलग 3 सामने गमवावे लागले होते, पण त्यानंतर टीम इंडियाने दमदार पुनरागमन करत फायनलपर्यंत उत्कृष्ट खेळ दाखवला. मात्र आता प्रश्न असा उपस्थित झाला आहे की, वर्ल्ड कपनंतर हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) निवृत्ती घेणार का? या प्रश्नाचं उत्तर हरमनप्रीतने स्वतःच्या वक्तव्यात दिलं आहे.
सामन्यानंतर हरमनप्रीत कौरने निवृत्तीबाबत मोठा संकेत दिला. ती म्हणाली, आम्हाला विश्वचषक जिंकायचाच होता, आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो. आता हा क्षण आला आहे. हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. पुढील वर्षी टी-20 विश्वचषक आहे आणि त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीही आहे. अनेक मोठ्या संधी आपल्यासमोर आहेत. आम्हाला फक्त अजून चांगलं व्हायचं आहे आणि संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करायची आहे.
हरमनच्या या वक्तव्यातून स्पष्ट झालं की, ती सध्या तरी निवृत्ती घेण्याच्या विचारात नाही. तिचं लक्ष आगामी टी-20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीकडे आहे. तसेच, वर्ल्ड कपदरम्यान अशा चर्चा समोर आल्या होत्या की, हरमनप्रीत या स्पर्धेनंतर निवृत्ती जाहीर करू शकते.
भारताने शानदार खेळ करत अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केला. या सामन्यात दीप्ती शर्मा ही सामन्याची हिरो ठरली, तिने 58 चेंडूत 58 धावा केल्या आणि गोलंदाजीतही 5 विकेट्स घेतल्या.
हरमनप्रीत कौरने विश्वचषक 2025 मध्ये 9 सामन्यांतील 8 डावांत 32.50 च्या सरासरीने 260 धावा केल्या. तिने 2 अर्धशतकं झळकावली होती. मात्र अंतिम सामन्यात तिच्या बॅटने खास चमक दाखवली नाही, तिने 20 धावा केल्या. पण सेमीफायनलमध्ये तिचा जबरदस्त फॉर्म दिसून आला होता. तिने 89 धावांची शानदार खेळी करत टीम इंडियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती.





