इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू अॅलिस्टर कूकने मंगळवारी भारताविरुद्ध पार पडलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. पण त्याच्यासाठी हा शेवटचा सामना खास ठरला आहे.
आयसीसीने मंगळवारी इंग्लंड विरुद्ध भारत संघात पार पडलेल्या कसोटी सामन्यांनंतर बुधवारी कसोटी क्रमवारी जाहिर केली आहे. या क्रमवारीत कूकने दहा फलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. त्यामुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट गोड झाला आहे.
त्याने शेवटच्या सामन्यात पहिल्या आणि दुसऱ्या डावात अनुक्रमे 71 आणि 147 धावा अशा मिळून एकूण 218 धावा केल्या. यामुळे इंग्लंडने या सामन्यात 118 धावांनी विजय मिळवत 5 सामन्यांची कसोटी मालिकाही 4-1 अशा फरकाने जिंकली.
यामुळे कूकने कसोटीतील फलंदाजांच्या क्रमवारीत 10 वे स्थान मिळवले आहे. या मालिकेतील पहिल्या चार सामन्यात कूकला धावा करण्यात अपयश आले होते. त्याला या चार सामन्यात मिळून फक्त 109 धावा करता आल्या होत्या. त्यामुळे त्याची क्रमवारीतही घसरण झाली होती.
पण आता त्याने 11 स्थानांची प्रगती करत 10 वे स्थान मिळवत कारकिर्दीचा शेवट केला आहे. यामुळे तो निवृत्ती घेताना तिसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम क्रमवारी असलेला इंग्लंडचा फलंदाज ठरला आहे. याआधी इंग्लंडचे माजी फलंदाज वॅली हॅमन्ड पाचव्या क्रमांकावर असताना तर जेफ बॉयकॉट आठव्या स्थानी असताना निवृत्त झाले होते.
तसेच कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या चार फलंदाजांपेक्षाही कूक सर्वोत्तम क्रमवारी असताना निवृत्त झाला आहे. यात सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड हे 18 व्या क्रमांकावर असताना निवृत्त झाले होते. तर जॅक कॅलिस 12 आणि रिकी पाँटींग 26 व्या स्थानावर असताना निवृत्त झाला होता.
कूक कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये पाचव्या स्थानावर आहे. त्याने 161 कसोटी सामन्यात 12472 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 33 शतकांचा आणि 57 अर्धशतकांचा समावेश आहे.
याबरोबरच आयसीसीने जाहिर केलेल्या या कसोटी क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानावर कायम राहिला आहे. तर शेवटच्या कसोटीत शतक करणाऱ्या केएल राहुलने 16 स्थानांची प्रगती करत 19 वे स्थान मिळवले आहे. तसेच यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतनेही 111 वे स्थान मिळवले आहे.
त्याचबरोबर गोलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसन अव्वल स्थानी कायम राहिला आहे. तो या मालिकेतील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर त्याने कारकिर्दीच 564 विकेट घेत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज बनण्याचाही पराक्रम केला आहे.
तसेच भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा या गोलंदाजी क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे. तर आर अश्विन आठव्या क्रमांकावर आहे. याबरोबरच अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत जडेजाने दुसरे स्थान मिळवले आहे.
अन्य गोलंदाजांमध्ये बेन स्टोक्स 27 व्या स्थानी, आदिल रशीद 44 व्या स्थानी आणि सॅम करन 51 व्या स्थानी आला आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–पराभवानंतरही टीम इंडिया अव्वल स्थानी कायम
–काय आहे मॅकग्राचे अँडरसनला नवीन आव्हान?
–कूक-पीटरसनमध्ये मैत्रीचे नवे पर्व?