आयपीएल पाठोपाठ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सुद्धा आपला फॉर्म जबरदस्त राखत दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमलाने सार्वधिक वेगवान ७००० धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. यापूर्वी हा विक्रम भारताच्या विराट कोहलीच्या नावावर होता. १५० डावात ७००० धावा करताना अमलाने विराटचा एवढ्याच धावा १६१ डावात कारण्याचा विक्रम तब्बल ११ डावांनी मागे टाकला.
इंग्लंडला १५३ धावांत गुंडाळल्यानंतर फलंदाजी करताना ६व्या षटकात फिनला खणखणीत चौकार खेचत हा विक्रम त्याने आपल्या नावावर केला. जानेवारी २०१६ मध्ये मेलबॉऊर्न येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना विराट कोहलीने १६१ डावात वेगवान ७००० धावा करण्याचा विक्रम केला होता. विशेष म्हणजे सर्वात कमी सामन्यांत ७००० धावा करण्याचा विक्रमही अमलाच्या नावावर आहे.
हाशिम अमलाच्या नावावर सध्या १५३ सामन्यांत १५० डावात फलंदाजी करताना ५० च्या सरासरीने ७००० धावा आहेत.
वेगवान ७००० धावा करणाऱ्या पहिल्या ५ फलंदाजांच्या यादीत विराटसह सौरव गांगुली हा एकमेव भारतीय असून गांगुलीने हा विक्रम २००१ साली १७४ डावात केला होता तर मास्टर ब्लास्टर सचिनला एवढ्याच धावा करायला १८९ डाव लागले होते.
वेगवान ७००० धावा करणारे फलंदाज ( डाव )
१५० हाशिम अमला
१६१ विराट कोहली
१६६ एबी डिव्हिलिअर्स
१७४ सौरव गांगुली
१८३ ब्रायन लारा