प्रो कबड्डीचा पाचवा मोसम आणि विक्रम हे आता समीकरणच झाले आहे. या मोसमामध्ये खेळाडूंसाठी विक्रमी रक्कम मोजली गेली. मोसमाच्या बक्षिसात पण मोठी वाढ केली असुन या वर्षी विजेत्यांना एकूण ८ कोटी रुपये मिळणार आहेत. या मोसमात राहुल चौधरीने ५०० रेडींग गुणांचा पल्ला गाठून नवीन विक्रम केला आहे.
यात आजच्या होणाऱ्या पहिल्या सामन्यात एक नवीन विक्रम पहायला मिळणार आहे. या सामन्यात गुजरात आणि हरयाणाचे संघ एकमेकांसमोर उभे असणार आहेत. या सामन्यात गुजरातचा खेळाडू फझल अत्राचली याच्या नावावर नवीन विक्रम होणार आहे. फझलने प्रो कबड्डीच्या ३३ सामन्यात एकूण १०१ गुण मिळवले आहेत त्यातील २ गुण त्याने रेडींगमध्ये मिळवले आहेत तर बाकीचे ९९ गुण त्याने डिफेन्समध्ये मिळवले आहेत. जर आज त्याने डिफेन्समध्ये एक गुण मिळवला तर तो डिफेन्समध्ये १०० गुण मिळवणारा पहिला विदेशी खेळाडू होऊ शकतो. त्याचा सध्याचा फॉर्म पाहता हे आज होणे सहज शक्य आहे.
रेडींगमध्ये १०० गुण मिळवणारा पहिला विदेशी खेळाडू होण्याचा मान बेंगाल वॉरियर्स संघाच्या जांग कुन ली याने मिळवला होता. यु मुंबा संघाकडून खेळताना आपल्या कारकिर्दीची सुरवात करणाऱ्या फझलने मागील मोसमात पटणा पायरेट्स संघाला विजेतेपद मिळवून देण्यात खूप मोठा वाटा उचलला होता आणि मागील वर्षी तो प्रो कबडीमधील बेस्ट डिफेंडर ठरला होता.
डिफेंडरच्या यादीत १० भारतीय खेळाडूंनी १०० पेक्षा जास्त डिफेन्समधील गुण मिळवले आहेत. यामध्ये मंजीत चिल्लर १९७ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर त्याच्या नंतर मोहित चिल्लर १७० गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.